Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने जोर धरला असून अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. त्यामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, काही भागांत पूर आणि भूस्खलनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Maharashtra Weather Update)
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, मुंबई, रायगड आणि रत्नागिरीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड व रत्नागिरीत पूरसदृश्य परिस्थितीचा धोका हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबईतील काही भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर पावसाचा कहर
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये मान्सूनने जोर धरला आहे.
पुणे व साताऱ्यात ४० ते १२० मिमी पाऊस अपेक्षित आहे.
सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट, तर इतर ठिकाणी यलो अलर्ट.
घाटमाथ्यावर भूस्खलनाचा धोका कमी असला तरी पाण्याचा निचरा आवश्यक आहे.
मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता
छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भात हलक्या पावसाची शक्यता
नागपूर, अकोला, यवतमाळ, वर्धा, अमरावती भागात १० ते २० मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपुरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
खानदेशात पावसाची उधळण
जळगाव व धुळे जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* पावसाच्या परिस्थितीनुसारच पेरणीचे नियोजन करावे.
* कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये पाण्याचा योग्य निचरा करावा.
* जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतांभोवती आडोसे व मातीच्या बांधाची व्यवस्था करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.