पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२६-२७ च्या विपणन हंगामासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी रास्त भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने २०२६-२७ विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींत वाढ केली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत एमएसपीत सर्वाधिक वाढ सूर्यफूल बियांसाठी (₹६२२ प्रति क्विंटल) सुचवण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस (₹ ५५७ प्रति क्विंटल), कारळे (नायजरसीड) (₹५१५ प्रति क्विंटल) तीळ (₹५०० प्रति क्विंटल) आहेत.
विपणन हंगाम २०२६-२७ साठी सर्व खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमती
| अ.क्र. | पिके | २०२६-२७ (₹/क्विंटल) | २०२५-२६ | वाढ (₹) |
|---|---|---|---|---|
| १ | तांदूळ (सर्वसाधारण) | २,४४१ | २,३६९ | ७२ |
| तांदूळ (ग्रेड A) | २,४६१ | २,३८९ | ७२ | |
| २ | ज्वारी (हायब्रीड) | ४,०२३ | ३,६९९ | ३२४ |
| ज्वारी (मालदांडी) | ४,०७३ | ३,७४९ | ३२४ | |
| ३ | बाजरी | २,९०० | २,७७५ | १२५ |
| ४ | नाचणी | ५,२०५ | ४,८८६ | ३१९ |
| ५ | मका | २,४१० | २,४०० | १० |
| ६ | तूर | ८,४५० | ८,००० | ४५० |
| ७ | मूग | ८,७८० | ८,७६८ | १२ |
| ८ | उडीद | ८,२०० | ७,८०० | ४०० |
| ९ | शेंगदाणा | ७,५१७ | ७,२६३ | २५४ |
| १० | सूर्यफूल बिया | ८,३४३ | ७,७२१ | ६२२ |
| ११ | सोयाबीन (पिवळा) | ५,७०८ | ५,३२८ | ३८० |
| १२ | तीळ | १०,३४६ | ९,८४६ | ५०० |
| १३ | कारळे | १०,०५२ | ९,५३७ | ५१५ |
| १४ | कापूस (मध्यम धागा) | ८,२६७ | ७,७१० | ५५७ |
| कापूस (लांब धागा) | ८,६६७ | ८,११० | ५५७ |
खरीप पिकांच्या MSP वाढीबाबत महत्त्वाचे मुद्दे
◼️ विपणन हंगाम २०२६-२७ साठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती (MSP) केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ मधील घोषणेनुसार अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट पातळीवर निश्चित करण्यात आल्या आहेत.
◼️ शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर सर्वाधिक अपेक्षित नफा मूग पिकासाठी ६१% मिळणार असून, त्यानंतर बाजरी व मका प्रत्येकी ५६% आणि तूर ५४% नफा देणारी पिके ठरणार आहेत.
◼️ उर्वरित सर्व खरीप पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या किमान ५०% अधिक लाभाची हमी देण्यात आली आहे.
◼️ सरकारने अलिकडच्या काळात तृणधान्यांबरोबरच कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्ये (श्री अन्न) यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी या पिकांना अधिक MSP दिला आहे.
◼️ २०१४-१५ ते २०२५-२६ या कालावधीत धान खरेदी ८,४१८ एलएमटी झाली, तर २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत ती ४५९० एलएमटी होती.
◼️ २०१४-१५ ते २०२५-२६ या काळात १४ खरीप पिकांची एकूण खरेदी ८,७४६ एलएमटी झाली, तर २००४-०५ ते २०१३-१४ दरम्यान ती ४६७९ एलएमटी होती.
◼️ २०१४-१५ ते २०२५-२६ या कालावधीत धान उत्पादक शेतकऱ्यांना MSP अंतर्गत १६.०८ लाख कोटी रुपये देण्यात आले, तर २००४-०५ ते २०१३-१४ या काळात ही रक्कम ४.४४ लाख कोटी रुपये होती.
◼️ २०१४-१५ ते २०२५-२६ या कालावधीत १४ खरीप पिकांच्या शेतकऱ्यांना MSP अंतर्गत १८.९९ लाख कोटी रुपये देण्यात आले, तर २००४-०५ ते २०१३-१४ या काळात ४.७५ लाख कोटी रुपये देण्यात आले.
अधिक वाचा: कर्जमाफीच्या याद्या तयार; शेतकऱ्यांना 'या' बँकांकडून मिळणार सर्वाधिक कर्जमाफीचा लाभ
