सोलापूर : मागील महिन्याखाली १० हजारांचा भाव खात असलेली तूर आता सात हजारांवर आली आहे. मोठ्या प्रमाणावर पेरणी क्षेत्र असलेल्या मराठवाडा व विदर्भातील तूर आता बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने तुरीच्या खरेदी दरात आणखीन घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
असे असले तरी हमी भाव केंद्र सुरू करण्याच्या हालचाली शासन पातळीवर दिसत नाहीत. मागील वर्षी पाऊस फारच कमी पडल्याने खरिपाची बहुतेक पिके गेली होती. त्यामुळे बाजारात उडीद, मूग व तुरीचे दर टिकून होते.
यंदा सर्वत्र पाऊस चांगला झाला आहे. काही ठिकाणी संततधार व मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने खरीप पिकांना फटका बसला आहे. असे असले तरी खरिपातील तुरीचे पीक चांगले आल्याने आता काढणीला वेग आला आहे. जसजशी तुरीची काढणी होईल तसतशी बाजारात विक्रीला येऊ लागली आहे.
मागील वर्षीच्या दुप्पटीहून अधिक तूर दररोज बाजारात विक्रीला येत असल्याचे विविध बाजार समितीवरून सांगण्यात आले. यंदा तूर बाजारात येण्यास सुरुवात झाली तेव्हा क्विंटलला आठ हजारांच्यावरती भाव मिळत होता. त्या दरात घसरण होत सात हजारांवर दर आला आहे.
साधारण लाल रंगाची तूर सात हजार ते साडेसात हजाराने विक्री होत असल्याचे सांगण्यात आले. पांढऱ्या तुरीला त्यापेक्षा कमी दर मिळत आहे. राज्यात मराठवाडा व विदर्भात तुरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.
या भागातील तुरीच्या काढणीला आता वेग येऊ लागला आहे. ही तूर बाजारात विक्रीला आल्यानंतर तुरीचे दर आणखीनच कमी होतील असे विविध बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी सांगितले.
हमी भाव केंद्राच्या हालचाली नाहीत
१) खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे बाजारात हमी भावापेक्षा दर कमी झाले तर हमी भाव केंद्रावर शेतकरी धान्य विकतात. तुरीचे दर सात हजार रुपयांच्या आत आले तर शेतकऱ्यांना हमी भाव केंद्रांवर विकण्याचा पर्याय आहे. मात्र, हमी भाव केंद्र सुरू करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू नसल्याचे सांगण्यात आले.
२) हमीभाव केंद्रावर धान्य विक्री करण्यासाठी ई-पीक नोंद असणे आवश्यक आहे. ई-पीक नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाच हमीभाव केंद्रावर नोंद करता येते. मात्र, बहुतेक शेतकऱ्यांनी तूर पीक ई-पीक नोंद केली नसल्याची हमीभाव केंद्रावर विक्रीची अडचण येणार आहे.
३) राज्यात १२ लाख ९६ हजार हेक्टर तुरीचे सरासरी क्षेत्र असताना १२ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. त्यापैकी विदर्भ, मराठवाड्यात १० लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्र तूर आहे.
दीड-पावणेदोन एकरात तूर पेरली होती. भरडणीनंतर १२ क्विंटल तूर झाली. ७ हजार ४०० रुपयाने तुरीची विक्री झाली. हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. तुरीला ७ हजार ५५० रुपये हमीभाव आहे. मशागत, पेरणी, बियाणे, फवारणी, काढणी व इतर खर्च वाढला आहे. - दीपक कदम, शेतकरी