रत्नागिरी: नैसर्गिक दुष्टचक्रामुळे यावर्षी आंबा उत्पादनाचे प्रमाण कमी राहिले असून, नवी मुंबईतीलबाजार समितीत गतवर्षीच्या तुलनेत विक्रीसाठी येणाऱ्या आंब्याची दुप्पटीने घसरण झाली आहे.
त्यातच आखाती प्रदेशातील युद्धामुळे आंबा निर्यात ठप्प झाल्याने त्याचा परिणात दरावर झाला आहे. उत्पादन कमी आणि दरात घसरण यामुळे यंदाही आंबा पिकांवर आर्थिक संकटाचे वादळ घोंगावू लागले आहे.
गतवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला व तो ऑक्टोबरपर्यंत लांबल्याने जमिनीत ओलावा होता. त्यामुळे पालवी मोठ्या प्रमाणावर आली. मात्र, डिसेंबरपासून थंडी सुरू होताच मोहर प्रक्रिया सुरू झाली.
मोहर भरपूर आला; परंतु यामध्ये नर मोहर अधिक असल्यामुळे अपेक्षित फळधारणा झालीच नाही. त्यातच मोहर करपून गळून गेला.
शेवटच्या टप्प्यातील आंबा झाडावर असला तरी प्रमाण १५ ते २० टक्के एवढेच आहे. यावर्षी ८० टक्के आंबा उत्पादन कमी असल्याचा अहवाल कृषी विभाग व डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने दिला आहे.
यावर्षी आंबा उत्पादन कमी असताना दर टिकून राहतील अशी बागायतदारांची अपेक्षा होती. मात्र, आखाती प्रदेशातील युद्धामुळे आंबा निर्यातच होत नसल्यामुळे दरात घसरण झाली आहे.
सध्या मुंबई व उपनगर तसेच अन्य राज्यांत आंब्यांची विक्री होत आहे. महागडा आंबा स्थानिक ग्राहक खरेदी करू शकत नसल्यामुळे आंब्याला फारसा दर मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या २ हजार ते ६ हजार असा पेटीला दर मिळत आहे. तर गतवर्षी १,५०० ते ४ हजार एवढा दर होता. तुलनेने गतवर्षीपेक्षा ५०० रुपयांनी दर अधिक आहे.
मात्र, गतवर्षी फेब्रुवारीपासूनच आंबा बाजारात विक्रीसाठी येऊ लागला होता. त्यामुळे त्याचा दर कमी होता.
यंदा आंबा उशिरा बाजारात येत आहे. त्याची उपलब्धताही कमी आहे. मात्र तरीही अपेक्षित दर मिळत नसल्याने बागायतदार निराश झाले आहेत.
गतवर्षीपेक्षा विक्रीचे प्रमाण कमी
◼️ उष्मा वाढल्याने आंबा जसजसा तयार होत आहे, तसा बागायतदार आंबा काढून विक्रीसाठी पाठवत आहेत.
◼️ सध्या नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज २५ ते ३० हजार आंबा पेटी विक्रीला येत आहे.
◼️ गतवर्षी याच हंगामात ५० ते ६० हजार आंबा पेटी विक्रीला होती.
सरकारकडून हवा मदतीचा हात
◼️ बदलत्या हवामानामुळे यावर्षी आंबा पिकाचे गणित बिघडले आहे. त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
◼️ मार्च महिन्यातही गारपिटीसह पाऊस पडल्याने फळाची गळ मोठ्या प्रमाणात झाली आहे.
◼️ या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने मदतीचा हात देण्याची अपेक्षा बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
आंबा पेटीचा दर (हजारी)
◼️ सध्याचा दर - २,००० ते ६,०००
◼️ गतवर्षीचा दर - १,५०० ते ४,०००
८०% आंबा उत्पादनात घट
यावर्षी आंबा हंगाम उशिरा सुरू झाला आहे, शिवाय उत्पादनही कमी आहे. त्यातच परदेशी निर्यात होत नसल्यामुळे खरेदीसाठी फारसा प्रतिसादच मिळत नसल्यामुळे दरात घट झाली आहे.
अधिक वाचा: एकदा तयार केलेले मृत्युपत्र रद्द किंवा बदलता येते का? काय आहे नियम? वाचा सविस्तर
