कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत राहण्यासह पोटभर जेवणाची व्यवस्था करणार आहे. शेतकऱ्यांसाठी मोफत व्यवस्था करणारी 'कोल्हापूर बाजार समिती' ही राज्यातील पहिली बाजार समिती आहे.
करवीर, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड व कागल (निम्मा) असे साडेसहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र कोल्हापूर बाजार समितीचे आहे.
समितीचे वार्षिक उत्पन्न १८ कोटी ९४ लाख ७९ हजार ७०३ रुपये आहे, तर १८ कोटी २९ लाख २२ हजार ७९४ कोटीचा खर्च असून, मार्च २०२५ अखेर ६५ लाख ५६ हजार ९०९ रुपयांचा नफा झाला आहे.
समितीमध्ये जिल्ह्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातून रोज सरासरी दोन हजार शेतकरी शेतमाल घेऊन येतात. भाजीपाला, कांदा-बटाटा, गूळ, फळांचा सौदा लवकर होत असल्याने बहुतांशी शेतकरी अगोदरच्या रात्रीच माल घेऊन येतात.
मग, त्यांच्या निवासासह जेवणाची कुंचबणा होते. अडत दुकानात रात्र काढावी लागते. यासाठी सभापती सूर्यकांत पाटील व संचालक मंडळाने समितीमध्ये त्यांच्या राहण्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे.
राज्यात हिंगणघाटसह इतर काही समित्यांमध्ये थोडे पैसे घेऊन या सोयी दिल्या जातात. मात्र, मोफत सुविधा देणारी 'कोल्हापूर' बहुधा पहिलीच बाजार समिती आहे.
अडते देणार शेतकऱ्यांना कुपन
शेतकरी ज्या अडत दुकानात माल घेऊन आला, संबंधित अडते शेतकऱ्यांना कुपन देईल. ते पाहून समिती व्यवस्थापन त्यांची व्यवस्था करणार आहे.
दृष्टिक्षेपात शेतीमालाची वार्षिक आवक, क्विंटलमध्ये
शेती माल - आवक
कांदा - १३,६५,९९५
बटाटा - ६,७०,८२८
गूळ - ६,०३,१३०
भाजीपाला - ५,५९,२८४
कडधान्ये - ४,६३,१४३
फळे - २,०१,३७३
लसूण - ६८,८०८
एकूण - ३९,३२,५६०
शेतकऱ्याला उपाशीपोटी उघड्यावर झोपवणे योग्य नाही. यासाठी हा उपक्रम सुरू केला. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना अभिमान वाटेल असे उपक्रम राबवू. - सूर्यकांत पाटील, सभापती, बाजार समिती
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कायदेशीररीत्या कमी करायचीत? कशी कराल? वाचा सविस्तर
