कुर्डूवाडी : इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष-बेदाण्याचे दर कमी झाले असून, यामुळे द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे. लवकरात लवकर ही स्थिती सुधारण्याची अपेक्षा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.
तीन वर्षापासून द्राक्ष बागायदारांच्या द्राक्षाला अन् बेदाण्याला अपेक्षित असा दर मार्केटमधून मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागांवर कुऱ्हाड चालवल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.
त्यातूनही काही शेतकऱ्यांनी सावरत यंदाच्या हंगामात तरी भाव मिळेल या भावना व्यक्त केली. मात्र, यंदाही ओल्या दुष्काळामुळे निम्म्या बागांना माल लागला नाही.
त्यातूनही उत्कृष्टरीत्या जोपासलेल्या बागांचा माल आता इराण अन् अमेरिका युद्धाच्या चर्चेने बाजारपेठेत व्यापारी कमी दराने माल मागू लागल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा धास्तावला आहे.
जिल्ह्यात सुमारे ५० हजार हेक्टरवर द्राक्षबाग असून, नान्नज, कासेगाव, करकंब व माढा तालुक्यातील संपूर्ण भागात प्रामुख्याने द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर बेदाणा निर्मितीचे काही उद्योग या परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत.
जिल्ह्यातील बेदाणा व उच्च दर्जाच्या द्राक्षांची निर्यात ही अत्यल्प असून, राज्यातील व देशातील अनेक बाजारपेठेत गाड्यावर विक्री होणारे द्राक्ष सुमारे ७२ टक्के, बेदाणा निर्मिती २६ टक्के, वाईनसाठी १.५ टक्के आणि ज्यूससाठी ०.५ टक्के या पद्धतीने येथील द्राक्ष उत्पादित होते.
सध्या इराण आणि अमेरिका युद्धाचा भडका उडाला असताना त्याच्या नावाखाली थेट फटका येथील द्राक्ष विक्रीवर झाल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील ४ ते ६ टक्केच द्राक्षे व बेदाणा युरोपियन देशात निर्यात केला जातो. तर आखाती देशांत मात्र आजपर्यंतच्या नोंदीवरून निर्यात केली जात नसल्याचे दिसून येते.
हवामानामुळे उत्पादनात ५० टक्के घट
◼️ यंदाच्या हवामानाचा व मोठ्या पावसाचा फटका बसल्याने द्राक्ष उत्पादनात सुमारे ५० टक्के घट झाली. त्यामुळे सुरुवातीला बाजारात द्राक्षाला व बेदाण्यालाही चांगला दर मिळत होता. मात्र, युद्धाच्या नावाखाली तो दर कमी झाला आहे.
◼️ सुरुवातीला ४२० रुपये प्रतिकिलो विक्री होणारा बेदाणा सध्या बाजारपेठेत २६० ते ३२० रुपयांपर्यंत विक्री होऊ लागल्याने प्रतिकिलो शंभर रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
◼️ सुरुवातीला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो मार्केटिंग द्राक्षाला मिळणारा भाव सध्या ६० ते ८० रुपयांवर आल्याने त्यातही ३० ते ४० रुपयांची तूट सहन करावी लागत आहे.
यंदा द्राक्षाला व बेदाण्याला सुरुवातीला चांगला दर मिळाला. मात्र, इराण अन् अमेरिका युद्धाच्या नावाखाली व्यापाऱ्यांनी दर कमी केले. आजपर्यंतच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील द्राक्ष व बेदाणा फक्त युरोपियन देशात ४ ते ६ टक्केच जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तीन चार वर्षांपासून द्राक्ष बागायतदारांची कोलमडलेली आर्थिक परिस्थिती यंदा तरी सुधारण्याचा प्रयत्न करावा. - नितीन कापसे, अध्यक्ष, कृषीनिष्ठ परिवार, कापसेवाडी
अधिक वाचा: ज्वारीच्या उत्पादनात घट, दरात मात्र दुपटीने वाढ; वाचा शाळू ज्वारीला प्रतिक्विंटल काय दर?
