पुणे : जिल्ह्यासह पुणे विभागात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका नवीन लाल कांद्याला बसला आहे. एक ते दीड महिने पीक लांबणार आहे. सध्या साठवणीत असलेला जुना कांदाबाजारात दाखल होत आहे.
या कांद्यालाही अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे एकीकडे नवीन पिकाचे नुकसान, तर दुसरीकडे जुन्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकूणच सहा महिन्यांपासून कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे.
परदेशातील घटलेली निर्यात, तर दक्षिण भारतातून अपेक्षित मागणी नसल्याने कांद्याला भावच मिळत नाही. त्यामुळे भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी जुना कांदा साठवून ठेवला आहे.
दरवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला नवीन कांदा बाजारात येत असतो. मात्र, अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दीड महिना विलंबाने म्हणजे १५ डिसेंबरपासून नवीन कांदा मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे.
सध्या तुरळक प्रमाणात आवक होत आहे. त्यास नाममात्र दर मिळत आहे. जुना कांद्याची आवक मागील वर्षी ऑक्टोबर अखेरलाच संपली होती. मात्र, यंदा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवला आहे. त्याची आवक सध्या मोठी होत आहे.
गुरुवारी मार्केटयार्ड बाजारात ११० ट्रक जुन्या कांद्याची आवक झाली. नवीन कांदा बाजारात कमी प्रमाणात येत असल्याने या कांद्याच्या भावात किलोमागे २ ते ३ रुपयांनी वाढ झाली आहे.
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार १२ ते १८ रुपये भाव मिळत असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही.
वाहतूक खर्चही करावा लागत आहे. त्यातच जुना साठवणुकीतील माल बराच खराब झाला आहे. त्यामुळे तेथेही शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
सध्या येथून होतेय आवक
मार्केट यार्ड बाजारात जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रींगोदा व पारनेर भागातून आवक होत आहे. नवीन कांद्याची पुरंदर, सातारा जिल्ह्यातून फलटण भागातून आवक होत आहे.
एप्रिलपासून कांद्याला कमी भाव मिळत आहेत. नवीन पिकाचे नुकसान झाले आहे. जुन्यालाही भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. वितरण व्यवस्था, निर्यात धोरण व्यवस्थित नसल्यामुळे हे घडत आहे. यावर त्वरित पाऊल उचलून सरकारने उपाययोजना केली पाहिजे. - राम नरवडे, कांद्याचे व्यापारी, मार्केट यार्ड
अधिक वाचा: हिमालयात बर्फवृष्टीमुळे थंड वारे दक्षिण भारताकडे; कसा राहील थंडीचा अंदाज?
