प्रसाद माळी
सांगली: यंदा परतीच्या पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टी आणि महापुराचा मोठा फटका बसला.
यामुळे या भागातील कोरडवाहू पिके समजल्या जाणाऱ्या बहुतांश कडधान्य व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उर्वरित महाराष्ट्राची यंदा दिवाळी गोड होईल मात्र येणारे नवीन वर्ष महागाईचा भडका उडविणारे असेल.
डाळींच्या दरवाढीने नव्या वर्षाची सुरुवातच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मागील १५ दिवसांपासून विदर्भातील काही भाग संपूर्ण मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याला मोठ्या अतिवृष्टीचा सामना करावा लागला.
अजूनही तेथील अनेक भाग पुराने वेढले आहेत. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. अनेकांचे हातातोंडाला आलेले खरिपाचे पीक वाहून गेले. ढगफुटी, अतिवृष्टी आणि धरणातून सोडलेले पाणी यामुळे शेतजमीन पुराच्या पाण्यात वाहून जाऊन जमीन खरवडली गेली आहे.
यामुळे शेतकऱ्याचे तत्काळ न भरून येणारे नुकसान झाले आहे. यातच हा सर्व भाग कोरडवाहू समजला जाणारा व अधिक प्रमाणात कडधान्य या पिकवला जाणारा आहे.
खरिपाचे जवळपास ९० टक्क्यांहून अधिक पीक या पावसात वाहून गेले आहे. यामुळे अवघ्या महाराष्ट्राला येत्या काळात कडधान्य विशेषतः डाळींचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डाळींची आयात वाढणार
देशात जेव्हा डाळींचा तुटवडा पडतो तेव्हा टान्झानिया, ऑस्ट्रेलिया, म्यानमार अशा देशांमधून तूरडाळ, हरभरा तसेच अन्य डाळींची आयात करून दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात असतो. यंदाच्या आपत्तीजन्य स्थितीमध्ये डाळींची आयात वाढू शकते.
यंदा मटकीचे दर भडकले
गतवर्षी कर्नाटक आणि तमिळनाडूत जोरदार पाऊस झाल्यामुळे तेथून आपल्याकडे येणारे मटकीचे दर यंदा कडाडले आहेत. मागील वर्षी मटकी २० रूपये किलो होती परंतु यंदा १७५ रूपये किलो इतका दर झाला आहे.
डाळींच्या प्रदेशाचे नुकसान
◼️ लातूर, सोलापूर, उदगीर, उस्मानाबाद, अकोला या भागात तूर, मूग, उडीद, मटकी, हरभरा अशी कडधान्य पिके घेतली जातात.
◼️ खरिपात प्रामुख्याने तूर, मूग, उडीद, मटकी घेतली जाते. या पिकांचे सध्या झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झाले.
◼️ तसेच जमीन वाहून गेल्याने रब्बी हंगामातील पिकांसाठी जमीन तयार नसल्याने व शेतात थांबलेले पाण्यामुळे रब्बीची पेरणी तत्काळ अशक्य आहे. त्यामुळे रब्बीतील हरभरा आणि मसूर सारख्या कडधान्यांवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे.
◼️ यासह महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातून डाळी येतात. पण, या पावसाचा कर्नाटकच्या सीमाभागातही परिणाम झाल्याने तेथे सुद्धा हीच परिस्थिती आहे.
सर्वाधिक कडधान्य पिके घेणारे जिल्हे व भाग
लातूर : तूर, हरभरा, मूग, उडीद, मटकी
सोलापूर : तूर, हरभरा, मूग, उडीद उदगीर
(लातूर उपविभाग) : तूर, हरभरा, मूग, उडीद, मटकी
उस्मानाबाद : तूर, हरभरा, मूग, उडीद, मटकी
अकोला : हरभरा, तूर, मूग, उडीद, मसूर
यंदाच्या दिवाळीच्या सणाला डाळींचा दर भडकणार नाही. कारण सध्या आपल्याकडे डाळींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पण, सध्या मराठवाड्यामधील पुरामुळे सर्व पीके वाहून गेलेली असल्याने येत्या जानेवारीपासून आपल्याला डाळीचा तुटवडा जाणवायला लागेल. यामुळे तेव्हा डाळींचे भाव भडकण्याची शक्यता आहे. - गजानन पाटील, होलसेल डाळी व धान्याचे व्यापारी, मार्केट यार्ड, सांगली
अधिक वाचा: केळीच्या मार्केटमध्ये चढ-उतार; मागील पाच महिन्यांत केळीच्या बाजारभावात कसे झाले बदल?