अमेरिका अन् इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून बाजारपेठेतील द्राक्षांचे दर ३० ते ४० रुपयांपर्यंत कमी केले होते.
बदलत्या हवामानामुळे यंदा ५० टक्क्यांपर्यतच द्राक्ष उत्पादन झाले असतानाही व्यापाऱ्यांकडून दर कमी केल्याने द्राक्ष बागायतदारांकडून चिंता व्यक्त होत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष उत्पादकांकडून बेदाणा निर्मितीला वेग आला आहे.
बाजारपेठेतही मार्केटच्या द्राक्ष विक्रीला उच्चांकी दर मिळू लागला आहे. सध्या उच्च प्रतीच्या बेदाण्याला प्रतिकिलो २५० ते ३५० रुपयांपर्यंत दर मिळू लागला आहे तर मार्केटच्या द्राक्षालाही ६० ते ८० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
माढा तालुक्यासह उत्तर सोलापूर, बार्शी, पंढरपूर तालुक्यांत द्राक्ष उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांसाठी उत्पादनाचा महत्त्वाचा सोर्स म्हणून त्याकडे पाहिले जाते.
चार वर्षापासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक व हवामान बदलामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. उत्पादित मालालाही अल्प दर मिळत गेल्याने अनेक शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी बागा काढून टाकाव्या लागल्या.
त्यानंतर मात्र बाजारपेठेसाठी मालच कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने गेल्या व यंदाच्या वर्षी उच्च प्रतीच्या मालाला भाव चांगला मिळू लागला होता.
तोपर्यंत युद्धाच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून भाव कमी करण्याचे प्रकार काही दिवसांखाली घडले. मात्र, आता उत्पादित बेदाण्याला व मार्केटच्या द्राक्षाला उच्चांकी दर मिळू लागले आहेत.
यंदा बेदाण्याला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. सोलापूर, पंढरपूर मार्केटमध्ये बेदाणा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
बेदाणा निर्मितीत घट
◼️ सन २०२२-२३ च्या दरम्यान २.७० लाख मेट्रिक टन बेदाणा निर्मिती शेतकऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर मात्र प्रत्यक्षातील उत्पादन कमी झाले.
◼️ यंदा कमी उत्पादनामुळे अवघे १.५ लाख मेट्रिक टन बेदाणा निर्मिती होण्याची शक्यता द्राक्ष तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे उच्चांकी दर राहण्याची शक्यता आहे. मार्केटच्या द्राक्षालाही उच्चांकी दर मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
बेदाण्याला सध्या २५० ते ३५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. उच्च प्रतीच्या द्राक्षालाही ६० ते ८० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर मिळत आहे. यंदा द्राक्ष उत्पादन ५० टक्क्यांवर आले असल्याने उच्चांकी दर शेवटपर्यंत राहणार आहे. युद्धाचा काही परिणाम होत नाही. मालाला युरोपियन देशातून वाढती मागणी आहे. - नितीन कापसे, अध्यक्ष, कृषीनिष्ठ परिवार
अधिक वाचा: रॉकेल वाटपाचा जीआर आला; आता एका रेशन कार्डवर नक्की किती रॉकेल मिळणार? वाचा सविस्तर
