पुणे : नवीन वर्ष आणि रमजानपूर्वी देशांतर्गत बासमती तांदळाच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच, इराण, इराक, दुबई आदी देशांकडून निर्यात वाढली आहे.
गेल्या वर्षीचा जुना स्टॉक जवळपास संपल्याने बाजारात उपलब्धतेची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या बासमती तांदळाच्या दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात हरियाना, पंजाबसह मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. धान भिजल्याने तुकड्याचे प्रमाण वाढले असून, खराब धान्याचे प्रमाण वाढले आहे.
आंबेमोहोर तांदळाचे भाव गगनाला भिडले
◼️ आंबेमोहोर तांदळाचे भाव नवीन हंगामाच्या सुरुवातीला या वर्षीसुद्धा २५ ते ३० टक्क्यांहून वाढून घाऊक बाजारात १२००० ते १४००० प्रतिक्विंटल सुरुवात झाली आहे.
◼️ गेल्या दोन वर्षांत आंबेमोहोर तांदळामध्ये डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच खूप मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली असल्याने प्रतिकिलो १२० ते १४० रुपये किलो भाव आहे.
◼️ त्यामुळे दर सर्वाधिक असल्याने पारंपारिक बासमती तांदूळ खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला.
| प्रकार | सध्या भाव (₹/किलो) | गतवर्षी भाव (₹/किलो) |
|---|---|---|
| बासमती ११२१ | ११० ते १२५ | ९० ते ११० |
| बासमती १५०९ | ९० ते १०० | ७५ ते८५ |
| सेला बासमती | ७५ ते १०० | ६५ ते ९० |
| तुकडा बासमती | ७० ते ७२ | ५५ ते ६० |
| कोलम | ६० ते ७० | ५५ ते ६० |
| काळीमुछ | ७० ते ८० | ६५ ते ७५ |
| इंद्रायणी | ५० ते ७५ | ४५ ते ६५ |
पूर व अतिवृष्टीमुळे तांदळाचे उत्पादन घटले आहे. तांदूळ उत्पादन क्षेत्रात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात भात काढणीच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली होती. त्यामुळे तांदूळ उत्पादन घटले असून चांगल्या मालाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सध्या तांदळाचे भाव तेजीत आहे. तसेच आंबेमोहर तांदळाचे भाव २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा कल पारंपरिक बासमती तांदूळ खरेदीकडे वळला आहे. - अभय संचेती, तांदूळ व्यापारी
अधिक वाचा: दामाजी कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर; पहिला हप्ता किती देणार?
