Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातून बेदाणा निर्यातीत मोठी घट; देशाला यंदा किती रुपयांचे परकीय चलन गमवावे लागले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:22 IST

bedana niryat महाराष्ट्रात दरवर्षी २ लाख ५० हजार टन बेदाण्याचे उत्पादन होते. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रात जवळपास एक लाख टनाने बेदाण्याचे उत्पादन कमी झाले आहे.

अशोक डोंबाळेसांगली : नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील बेदाणा उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. २०२४-२५ आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत राज्यातून ४२ हजार ७१६ टन बेदाण्याची निर्यात झाली होती.

मागील वर्षाच्या तुलनेत बेदाणा निर्यातीत यंदा लक्षणीय घट झाली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात केवळ ७ हजार ९२४.९९ टन बेदाण्याची निर्यात झाली आहे.

गतवर्षाच्या तुलनेत बेदाण्याच्या निर्यातीत ८१.४५ टक्के घट झाली आहे. महाराष्ट्राला यामुळे दरवर्षी मिळणाऱ्या परकीय चलनात यावर्षी तब्बल ४१४ कोटी रुपयांची घट झाली आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी २ लाख ५० हजार टन बेदाण्याचे उत्पादन होते. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रात जवळपास एक लाख टनाने बेदाण्याचे उत्पादन कमी झाले आहे.

केवळ १,५०,००० टन बेदाण्याचे उत्पादन झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात बेदाण्याची विक्री सर्वाधिक झाली. या सर्व कारणांमुळे बेदाणा निर्यातीला गंभीर परिणाम झाला आहे.

कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या माहितीनुसार, २०२४-२५ आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातून ४२ हजार ७१६.४१ टन बेदाण्याची निर्यात झाली असून त्यातून ५४१ कोटी २१ लाख रुपये परकीय चलन मिळाले होते.

मात्र, २०२५-२६ आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत केवळ सात हजार ९२४.९९ टन बेदाण्याची निर्यात झाली असून त्यातून १२७ कोटी ११ लाख रुपये परकीय चलन मिळाले.

म्हणजेच, ३४ हजार ७९१.४२ टन बेदाण्याची निर्यात कमी झाली आहे. ज्यामुळे देशाला ४१४ कोटी १ लाख रुपयांचे परकीय चलन गमवावे लागले.

या देशात होतेय बेदाणा निर्यातबेदाण्याची निर्यात मोरोक्को, रोमानिया, रशिया, सौदी अरेबिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशात होते, असे निर्यातदारांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून द्राक्षाच्या उत्पादनात घट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागा काढून टाकल्यामुळे ही महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादन कमी झाले. यामुळे बेदाण्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि त्याचा औचित्यपूर्ण परिणाम निर्यातीवर ही झाला आहे. मात्र, बेदाण्यास चांगले दर मिळत आहेत. - राजेंद्र कुंभार, अध्यक्ष, बेदाणा असोसिएशन आणि निर्यातदार

अधिक वाचा: पाटील बंधूंनी खडक फोडून लावली डाळिंबाची बाग; दोन एकर क्षेत्रातून काढला २६ लाखांचा माल

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra raisin exports plummet, costing India millions in foreign exchange.

Web Summary : Maharashtra's raisin exports significantly decreased due to natural disasters, causing a ₹414 crore loss in foreign exchange. Production fell by one lakh tons, leading to increased domestic sales and impacting exports to countries like Russia and Saudi Arabia.
टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डमहाराष्ट्रसांगलीशेतकरीपूरपाऊसहवामान अंदाजकाढणी पश्चात तंत्रज्ञानरशियाश्रीलंकासौदी अरेबियाविएतनामइंडोनेशिया