इंदापूर : आखाती देशातील युद्धविरामामुळे ठप्प झालेली फळांची निर्यात सुरू झाली आहे. इंदापूरमधील केळीलाबाजारपेठेत अक्षरशः सोन्याचे दिवस आल्याचे चित्र आहे.
केळीला प्रतिकिलोस १८ रुपये उच्चांकी दर मिळत आहे. इराण-अमेरिका तणावामुळे केळीची निर्यात मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती.
युद्धविरामामुळे परिस्थितीत सकारात्मक बदल झाला. निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने स्थानिक बाजारातही त्याचा अनुकूल परिणाम दिसू लागला आहे.
केळीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. अवघ्या काही आठवड्यांत केळीचा प्रतिक्विंटल १४००-१५०० रुपये असणारा दर थेट १९००-२१०० रुपयांवर पोहोचला आहे.
या संदर्भात केळीचे व्यापारी अॅड. आकाश बसळे म्हणाले की, यापूर्वी युद्धजन्य परिस्थितीत खराब झालेल्या सुमारे पाच हजार कंटेनरमुळे व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.
युद्धविरामानंतर बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. परिस्थिती सुधारत आहे. केळीचा उठाव चांगला होत आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
आजच्या घडीला बाजारपेठेत केळीची आवक काहीशी घटली आहे, मात्र मागणी वाढल्याने दरात तेजी दिसून येत आहे.
ही स्थिती पुढील किमान महिनाभर टिकेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली. निर्यात सुरू झाल्याने बाजारपेठेत चैतन्य आले आहे.
अधिक वाचा: इतर झाडाच्या तुलनेत नारळाच्या झाडावरच का पडते वीज? जाणून घ्या ह्या मागचे लॉजिक
