नासीर कबीर
करमाळा : सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात १५ लाख मेट्रिक टन केळीचे उत्पादन होत आहे. त्यापैकी ४० टक्के केळीची स्थानिक बाजारपेठेत व देशात विक्री होत आहे.
उर्वरित ६० टक्के केळीची आखाती देशात निर्यात होते. निर्यातक्षम केळी उत्पादनामुळे या फळ पिकाच्या माध्यमातून पाच हजार कोटींची उलाढाल होत आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यातून १६ हजार कंटेनर केळींची निर्यात झाली. त्यातून २२०० कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला उपलब्ध झाले आहे. यावर्षी देशासाठी ३४ हजार कंटेनर निर्यातीचे उद्दिष्ट समोर आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा निम्मा वाटा राहणार आहे.
जिल्ह्यामध्ये या पिकांच्या संदर्भातील वाहतूक, कृषी निविष्ठा, केळी रोपवाटिका यासह पॅकिंग मटेरियल व्यवसायाला चालना मिळाली आहे. त्यामुळे दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
देशात महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यांत केळीचे मोठे उत्पादन होते. परंतु या ठिकाणी या पिकासाठी ठरावीक हंगाम आहे. महाराष्ट्रातसुद्धा जळगावमध्ये ठरावीक हंगामातच केळीची लागवड केली जाते.
मात्र, सोलापूर जिल्ह्यातील केळी पिकासाठी नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले कोरडे वातावरण व अनुकूल असलेली नैसर्गिक स्थिती, जमिनीची प्रतवारी यामुळे संपूर्ण वर्षभर केळी लागवड होत असलेला देशातील एकमेव सोलापूर जिल्हा आहे. त्यामुळे निर्यातदारासाठी संपूर्ण वर्षभर या ठिकाणी केळी उपलब्ध असते.
कंदर अन् टेंभुर्णी जगाच्या नकाशावर
जिल्ह्यातील करमाळा, माढा तालुका हा केळीचे हब म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. करमाळा तालुक्यातील कंदर व माढा तालुक्यातील टेंभुर्णी परिसरामध्ये देशातील सर्व प्रमुख केळी निर्यातदार कंपन्यांनी आपली कार्यालये या परिसरात उघडली आहेत. त्यामुळे केळ निर्यातीबाबत ही दोन गावं जगाच्या नकाशावर उमटली आहेत.
देशातील केळी व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र येथे बनले आहे. अनुकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे सर्वात जास्त निर्यात करणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख झाली आहे. दिवसेंदिवस आखाती देशांमध्ये केळीला मागणी वाढत असल्यामुळे भविष्यात कृषी क्षेत्रामध्ये फार मोठी संधी या केळी पिकासाठी उपलब्ध आहे. - संजय वाकडे, उपविभागीय कृषी अधिकारी, कुर्डूवाडी
अधिक वाचा: पाखरांच्या किलबिलाटासाठी या शेतकऱ्याने सोडली एकरभर ज्वारी; वाचा सविस्तर