चंद्रकांत गायकवाड
तिसगाव : रासायनिक खतांचा असंतुलित वापर, पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धती व पिकांचा फेरपालट होत नसल्याने नगदी पिकांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चालले आहे.
दुसऱ्या बाजूला पीक हंगामाचे दिवस सारखे, मात्र उत्पादन खर्चातील विषमतेने पाथर्डीतील मुळा पाटचारीच्या लाभक्षेत्रातील गावात उन्हाळी बाजरीचे क्षेत्र वाढले आहे.
जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील वैभव व पोपटराव आंधळे या पिता-पुत्रांनी यावर्षी उन्हाळी बाजरीचे चार वाणांची आठ दिवसांचे अंतराने सुमारे २२ एकरांवर पेरणी केली.
उसाचा खोडवा तुटल्यानंतर पीक फेरपालट म्हणून गहू, कांदा अशी पारंपरिक हंगामी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, आता कांद्याचा एकरी खर्च ८० हजारांवर गेला आहे.
दुसरीकडे दर घसरत असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. रेशनवर गहू उपलब्ध असल्याने दोन ते अडीच हजार प्रती क्विंटल दर आहे.
त्या तुलनेत बाजरीला २,८०० रुपये क्विंटल भाव आहे. त्यामुळे यंदा बाजरी उत्पादन घेतल्याचे पोपटराव आंधळे म्हणाले.
वैभव आंधळे म्हणाले, की आठ दिवसांच्या अंतराने चार एकराचे टप्पे करून चार प्रकारच्या वाणांची छोट्या ट्रॅक्टरने जानेवारी, फेब्रुवारीमध्ये पेरणी केली. तणनाशकाची फवारणी करीत तणनियंत्रण केले.
शंभर दिवसांनंतर बाजरी काढणीला आली. आता हार्वेस्टरच्या मदतीने काढणी केली जाणार असल्याने मजुरांची अडचण नाही.
विविध प्रजातीचे वाण आठ दिवसांच्या अंतराने पेरणी केल्याने काढणी टप्याटप्प्याने करता येईल. तसेच, परागीकरण प्रकिया सुरळीत होऊन उत्पादनात वृद्धी होईल.
कांदा, गव्हाच्या तुलनेत मजुरी खर्चातील बचत व दरांतील तफावत लक्षात घेता, उन्हाळी बाजरी उत्पादन फायदेशीर असल्याचा दावा वैभव आंधळे यांनी केला आहे.
११ लाखांचे उत्पन्न मिळण्याची आशा
◼️ नांगरणी, पेरणी, तणनाशक फवारणी व काढणीसह १२ ते १३ हजार उत्पादन खर्च होईल.
◼️ एकरी १८ ते २० क्विंटल उत्पादन मिळाले, तरी ४५ हजार रुपये एकरी मिळतील.
◼️ २२ एकरांत ११ लाखांचे उत्पादन मिळण्याची आशा आहे.
अधिक वाचा: शेतकरी बांधवांनो कर्जमाफीचा लाभ हवा! तर 'या' कागदपत्राचे आजच प्रमाणीकरण करा
