पुणे : यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीला देशात ३५० लाख टन, तर राज्यात ११० लाख टन साखरेचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
मात्र, आता हे एकूण साखरेचे उत्पादन अनुक्रमे ३१५ आणि १०० लाख टन होईल, असे चित्र आहे. राज्यात आतापर्यंत ९८.८७ लाख टन, तर देशात २७१ लाख टन उत्पादन झाले आहे.
राज्यात पुढील १० दिवसांत गाळप हंगाम संपण्याची शक्यता आहे. देशातून यंदा सात ते आठ लाख टन साखर निर्यात, तर ३१ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाणार आहे.
देशात यंदा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ३५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, ३१ मार्चअखेर देशात २७१ लाख टन उत्पादन झाले आहे.
महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या साखर उत्पादक राज्यांपैकी महाराष्ट्रात पुढीत ८ ते १० दिवसांत, तर उत्तर प्रदेशातही लवकरच हंगाम संपेल.
यंदा गाळपास आलेला ऊस जवळपास संपला आहे. तर यापुढील गाळपातून साखर उतारा चांगला मिळत नाही. परिणामी उत्पादनात घट होणार आहे.
त्यामुळे यापूर्वी ३५० लाख टन उत्पादनाचा अंदाज आता २८३ ते २८५ लाख टनांवर आला आहे. तर अतिरिक्त ३१ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात सुरुवातीला ११० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यंदा एकूण २१० सहकारी व खासगी कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली होती.
त्यापैकी १८७ कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, उर्वरित २३ कारखाने पुढील ८ ते १० दिवसांत बंद होतील अशी स्थिती आहे. आतापर्यंत १ हजार ४३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.
त्यातून आतापर्यत ९८ लाख ८७ हजार टन साखर उत्पादन झाले आहे. तर सरासरी साखर उतारा ९.४८ टक्के मिळाला आहे.
सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात २३ लाख १९ हजार टन त्यानंतर पुणे विभागात २२ लाख १८ हजार टन, तर सोलापूर विभागात १९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात अंदाजित साखर उत्पादनापेक्षा १० लाख टन उत्पादन कमी होणार आहे.
इथेनॉल उत्पादनासाठी...
◼️ उत्तर प्रदेशातही यंदा १०५ लाख साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, नव्या अंदाजानुसार हे उत्पादन ९३ ते ९३ लाख टनांपर्यंतच पोचेल, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले.
◼️ ३५ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळविण्यात येईल, असा अंदाज होता. मात्र, नव्या अंदाजानुसार ३१ लाख टन साखर वापर इथेनॉलसाठी वापरण्यात येणार आहे.
◼️ गेल्या वेळी साखर निर्यातीवर बंदी होती. यंदा केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीनुसार सात ते आठ लाख टन साखरेची निर्यात होणार असल्याचे नाईकनवरे यानी ही माहिती दिली.
अधिक वाचा: 'शक्तिपीठ' महामार्गाच्या सुधारित आराखड्याला सरकारची मंजुरी; आता 'हे' नवीन तालुके जोडणार
