मुंबई : दुष्काळप्रवण भागात शेतीच्या पाण्यात ३० टक्क्यांपर्यंत बचत करू शकणारी स्मार्ट सिंचन पद्धती IIT Mumbai आयआयटी मुंबई, पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी या संस्थांनी एकत्रितपणे विकसित केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हा प्रायोगिक प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी पश्चिम बंगालमधील दुष्काळप्रवण बांकुरा जिल्ह्यात करण्यात आली.
त्यामध्ये हा प्रयोग मका, गहू, सूर्यफूल, भुईमूग, ऊस पाच वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांवर यशस्वीपणे केला, अशी माहिती आयआयटी मुंबईतील संशोधकांनी दिली.
आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी हवामानाचा अंदाज आणि मातीतील ओलावा यांच्या माध्यमातून हे संगणकीय मॉडेल विकसित केले आहे. हे मॉडेल पर्जन्याचा संभाव्य अंदाज, जमिनीतील पाण्याची क्षमता आणि पिकांसाठी आवश्यक पाण्याची गरज तपासते.
हवामान अंदाज, उपग्रहाद्वारे मिळालेली मृदा आर्द्रतेची माहिती आणि संगणकीय मॉडेलमधून पुढील तीन आठवड्यांपर्यंत किती सिंचन आवश्यक आहे, याचा अंदाज बांधणे शक्य होते.
तसेच या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांत पडणाऱ्या पावसाचा अंदाज बांधून सिंचनाचे नियोजन करता येते. त्यातून पाण्याचे योग्य नियोजन करून भूजल पातळी राखण्यासह पीक उत्पादनात वाढ करणे शक्य होते, असे आयआयटीतील तज्ज्ञांनी सांगितले.
या अभ्यासातून पारंपरिक सिंचन पद्धतीत जेवढे पाणी पिकांना लागते, त्यात १० ते ३० टक्क्यांपर्यत बचत होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
वनस्पती जमिनीतून पाणी कसे शोषतात?
नाशिकमधील प्रारंभिक अभ्यासात मृदा आर्द्रतेच्या माहितीस स्थानिक हवामान अंदाजाची जोड देऊन साधारणपणे ३० टक्के भूजलाची बचत शक्य होत असल्याचे शेतकऱ्यांना दाखवून दिले. यासाठी एका आठवड्यापर्यंतचा अल्पकालीन अंदाज वापरला, असे प्रा. सुभीमल घोष यांनी सांगितले. तसेच या मॉडेलमध्ये वनस्पती जमिनीतून पाणी कसे शोषतात, पाण्याअभावी त्यांची प्रतिक्रिया कशी असते आणि पाऊस किंवा सिंचनानंतर त्या कशा प्रतिक्रिया देतात, याचे चित्रण केले आहे, असेही प्रा. घोष म्हणाले.
अधिक वाचा: Ranbhajya : बाजारात आलेल्या 'या' आरोग्यवर्धक रानभाज्यांवर यंदा नक्की मारा ताव