Paddy Cultivation : रामटेक तालुक्यात यंदा पावसाची मोठी कमतरता जाणवत होती. त्यामुळे धानाच्या रोवणीला आवश्यक असलेले पाणी मिळत नव्हते. मात्र, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे पेंच जलाशयातील पाणी अखेर डाव्या कालव्यातून सोडण्यात आले असून, ४५.३१ क्यूमेकचा विसर्ग सुरू आहे. (Paddy Cultivation)
या पाण्यामुळे बांध भरले असून, रोवणीस वेग आला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना व मजुरांनाही हंगामाचे काम मिळण्यास सुरुवात झाली आहे.(Paddy Cultivation)
पावसाच्या कमतरतेमुळे रखडलेल्या धान पिकाच्या रोवणीला आता गती मिळण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारपासून (२९ जुलै) पेंच जलाशयातील पाणी डाव्या कालव्यातून सोडण्यात आले असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधांमध्ये आवश्यक तेवढे पाणी साचू लागले आहे. (Paddy Cultivation)
यामुळे चिखलणीसह रोवणीचे काम सुरू झाले असून, तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Paddy Cultivation)
पेंच पाटबंधारे विभागाचे उपअभियंता राजू भोमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, डाव्या कालव्यातून ४५.३१ क्यूमेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी रामटेकसह पारशिवनी, मौदा, भंडारा अशा विविध तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वापरता येणार आहे.(Paddy Cultivation)
पाऊस कमी, धान लागवडीला अडथळा
रामटेक तालुक्यात धान हे मुख्य पीक असून, दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मात्र, यंदा जून-जुलैमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे नियोजन बिघडले.
२४ ते ३० जुलै या कालावधीत फक्त १०५ मिमी पाऊस झाला.
१ जून ते ३१ जुलै दरम्यान एकूण ५१९ मिमी पावसाची नोंद झाली असली, तरी तो सातत्याने किंवा सर्वदूर झाला नाही.
यामुळे बांधात पाणी साचले नसल्याने चिखलणी आणि रोवणी रखडली होती.
पेंचसह प्रमुख जलाशयांची सध्याची स्थिती
जलाशयाचे नाव | एकूण साठवण क्षमता (दलघमी) | सध्याचा पाणीसाठा (%) | मागील वर्षी याच दिवशीचा साठा (%) |
---|---|---|---|
तोतलडोह | १,१६६ | ७०.२३% | ८१% |
पेंच | १८० | ८८.८५% | २०% |
खिंडसी | १०३ | ५८.८३% | ८१% |
चौराई (म. प्र.) | — | ६१% | — |
पेंच जलाशयावर ७० हजार हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचे सिंचन अवलंबून आहे. पेंच, तोतलडोह आणि खिंडसी हे तिन्ही जलाशय एकाच नदीवर (पेंच) असल्याने त्यांच्यातील पाण्याचा परस्परसंबंध आहे. चौराई धरण भरताच त्यातून तोतलडोह आणि पुढे पेंचमध्ये पाणी येते.
धान रोवणीला गती; मजुरांना रोजगार
डाव्या कालव्यातून पाणी सोडताच अनेक शेतकऱ्यांनी शेतात चिखलणी सुरू केली असून, धानाची रोवणी वेगाने सुरू झाली आहे. लोहडोंगरी, सालेकसा, मोहपार, बोरी या परिसरांतील शेतांमध्ये सध्या रोवणीसाठी मजुरांची झपाट्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, स्थानिक अर्थचक्राला चालना मिळाली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा, पण काळजीही आवश्यक
पेंचचे पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी पुढील पावसावरच खरीप हंगाम यशस्वी होईल की नाही, हे ठरणार आहे.
शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरणे, आणि पिकांचे योग्य नियोजन ठेवणे गरजेचे असल्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Paddy Plantation : धान सुकतंय… पाणी कुठंय? 'पेंच'चं पाणी येणार कधी?