ओतूर : प्रचंड उन्हाची तीव्रता असूनही जुन्नर तालुक्यातील परिसरातील शेतांमध्ये परराज्यातील कष्टकरी कामगारांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
मध्य प्रदेशातील सेंधवा, खंडवा, आदी दुर्गम भागांतून हिंदी भाषिक मजूर कुटुंबांसह येथे दाखल होत आहेत. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मर्यादित संधी आणि शेतीकामाची कमी उपलब्धता यामुळे हे मजूर उन्हाळ्यात रोजगाराच्या शोधात पुणे जिल्ह्यात येतात.
भर उन्हातही कोणतीही तक्रार न करता सलग काम करण्याची त्यांची तयारी असल्याने शेतकऱ्यांकडून या मजुरांना विशेष पसंती मिळत आहे.
स्थानिक मजूर बहुतेकदा रोजंदारीवर काम करतात, तर परराज्यातील मजूर ठरावीक काम 'उक्ते' (ठरावीक रकमेने पूर्ण काम) स्वरूपात घेऊन कमी कालावधीत ते पूर्ण करतात.
यामुळे शेतकऱ्यांनाही हे काम परवडणारे आणि वेळेत पूर्ण होणारे ठरत आहे. सध्या कांदा लावणी, भाजीपाला पिकांची निगा, खुरपणी, तोडणी आदी कामांसाठी या मजुरांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
शेतकऱ्याने राहण्याची सोय करून दिल्यास पती-पत्नींसह कुटुंबातील इतर सदस्यही कामात सहभागी होतात यामुळे शेतीची कामे जलद आणि प्रभावीपणे पूर्ण होत आहेत.
मध्य प्रदेशातील एका मजुराने 'लोकमत'शी बोलताना सांगितले, "आम्ही उन्हाळ्यात रोजगाराच्या शोधात पुणे जिल्ह्यात येतो आणि पावसाळा सुरू झाला की परत आमच्या गावी जातो.
पती-पत्नी मिळून दिवसाला साधारण १००० ते १२०० रुपये मिळतात. महिन्याला प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत मजुरी मिळत असल्याने आम्ही या कामावर समाधानी आहोत.
या मजुरांमुळे माळशेज परिसरातील शेतीकामांना मोठा हातभार लागला आहे. वाढत्या उष्णतेतही कष्टाच्या जोरावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या या कामगारांच्या मेहनतीचे कौतुक होत आहे.
स्थानिक शेतकरीही या मजुरांच्या निष्ठा आणि कामाच्या गतीचे कौतुक करतात. शेतकऱ्यांच्या मते, "परराज्यातील मजूर काम लवकर पूर्ण करतात आणि तक्रार करत नाहीत. राहण्याची सोय दिली तर संपूर्ण कुटुंब काम करते, त्यामुळे कामाची गुणवत्ता आणि वेग दोन्ही वाढते.
माळशेज परिसरातील शेती मुख्यतः कांदा, भाजीपाला, फळबागा यांवर अवलंबून असल्याने उन्हाळ्यात मजुरांची गरज अधिक भासते. या पार्श्वभूमीवर परराज्यातील मजुरांचा ओघ शेतीसाठी वरदान ठरला आहे.
रोजगार टंचाई आणि कमी कामाची उपलब्धता
◼️ स्थानिक मजूर बहुतेकदा रोजंदारीवर अवलंबून असतात, परंतु परराज्यातील मजुरांच्या येण्यामुळे ठरावीक कामे (जसे कांदा लावणी, खुरपणी, तोडणी) लवकर पूर्ण होतात. यामुळे स्थानिकांना कमी दिवस काम मिळते.
◼️ महाराष्ट्रात ग्रामीण भागात शेतमजूर टंचाई जाणवत असली तरी, काही भागांत (नाशिक, पुणे परिसर) परप्रांतीय मजुरांमुळे स्थानिकांना काम मिळणे अवघड झाले आहे.
मजुरी दरातील तफावत आणि स्पर्धा
◼️ परराज्यातील मजूर कमी दरात (किंवा उक्ते स्वरूपात) काम करतात, तर स्थानिक मजूर अधिक मजुरीची अपेक्षा करतात.
◼️ शेतकऱ्यांना परवडणारे पर्याय निवडावे लागतात. यामुळे स्थानिक मजुरांची मजुरी कमी राहते किंवा कामच मिळत नाही.
◼️ महाराष्ट्रात शेतमजुरीचे दर वाढले असले तरी, स्थानिकांना दुप्पट मजुरी मागावी लागते, ज्यामुळे शेतकरी पर्याय शोधतात.
अधिक वाचा: कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर
