सोलापूर : राज्यात साखर हंगामाने आता चांगलाच वेग घेतला असून ४ डिसेंबरपर्यंत राज्यात पावणेतीन कोटी मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे.
एकट्या सोलापूर जिल्ह्यात ४७ लाख मेट्रिक टन गाळप झाल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.
राज्यात १ नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने १० नोव्हेंबरनंतर ऊस गाळपाला वेग आला.
महिनाभरात अवघे १७८ साखर कारखाने सुरू झाल्याची नोंद साखर आयुक्त कार्यालयात झाली आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत राज्यात १४७ साखर कारखाने सुरू झाले होते. त्यात वरचेवर वाढ होत आहे.
डिसेंबरपर्यंत २०० साखर कारखाने सुरू होतील, असे सांगण्यात आले. राज्यात सुरू झालेल्यांपैकी नोंद असलेल्या १७८ साखर कारखान्यांचे दोन कोटी ७० लाख मे.टन गाळप झाले आहे.
साखर कारखाने सर्वाधिक असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील गाळपाची नोंद असलेल्या २९ कारखान्यांचे ४६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. आणखीन पाच साखर कारखाने सुरू असले तरी त्याची नोंद दिसत नाही.
साखर कारखान्यांच्या गाळपाचा आढावा
◼️ सोलापूर जिल्ह्यात आघाडीवर ४७ लाख मेट्रिक टन.
◼️ कोल्हापूर जिल्ह्याचे ३८ लाख मेट्रिक टन.
◼️ पुणे जिल्ह्याचे ३६ लाख मेट्रिक टन.
◼️ सातारा जिल्ह्याचे ३० लाख मेट्रिक टन.
◼️ अहिल्यानगरचे ३१ लाख मेट्रिक टन.
◼️ सांगली जिल्ह्याचे २५ लाख मेट्रिक टन
◼️ धाराशिव जिल्ह्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे.
साखर उतारा
◼️ साखर उताऱ्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असून ९.४२ टक्के इतका उतारा पडला आहे.
◼️ सांगली जिल्ह्याचा साखर उतारा ९.३६ टक्के.
◼️ सातारा जिल्ह्याचा ८.५९ टक्के.
◼️ छत्रपती संभाजीनगरचा ८.१४ टक्के.
◼️ पुणे जिल्ह्याचा ८.२ टक्के.
◼️ सोलापूरचा ७.७४ टक्के.
◼️ अहिल्यानगरचा ७.२६ टक्के याप्रमाणे साखर उतारा पडला आहे.
साखर कारखाने सुरू होत असले तरी ऊस दर मात्र जाहीर केले जात नाहीत. सर्वच साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर करावेत. यंदा सर्वच पिके अतिवृष्टी व महापुराने गेली आहेत. त्यामुळे शेतकरी फार मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत. अशा वेळी कारखानदारांनी ऊस उत्पादकांना अधिकाधिक दर देऊन सहकार्य करावे. - विजय रणदिवे, स्वाभिमानी शेतकरी संघटना
अधिक वाचा: पुणे जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याने एका दिवसात सर्वाधिक ऊस गाळप करत केला नवा उच्चांक
