राजाराम लोंढे
कोल्हापूर : दहा दिवसाला मिळणारा ताजा पैसा आणि याच पैशांवर बाजारात क्रेडिट निर्माण करून देणारा दुग्ध व्यवसाय जिल्ह्यात गती घेत आहे.
हे जरी खरे असले, तरी यामध्ये ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत गोठ्यात राबावे लागते.
आपल्याकडील तरुण या व्यवसायात मोठ्या प्रमाणात उतरले असले, तरी परप्रांतीय 'भय्यां' शिवाय दुभत्या जनावरांचे मोठे गोठे चालूच शकत नाहीत.
चौदा ते पंधरा तास गोठ्यात काम करावे लागते, त्यावेळीच घागरी भरून दूध काढू शकतो, तेवढी क्षमता आपल्या तरुणांमध्ये कमी पाहायला मिळते, त्यामुळेच जिल्ह्यातील गोठ्यात तीनशेहून अधिक परप्रांतीय 'भय्या' काम करीत आहेत.
'गोकुळ' व 'वारणा' दूध संघाने कोल्हापूर जिल्ह्यातील दूध व्यवसायाला बळकटी दिल्याने जिल्ह्याचे दूध उत्पादन वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत दूध व्यवसायात झपाट्याने वाढ झाली आहे.
म्हशीच्या दुधाला असणारी मागणी, 'गोकुळ'ने जाहीर केलेल्या ५० हजार रुपयांच्या अनुदानामुळे गोठ्यांची संख्या वाढत आहे.
मात्र, या गोठ्यावर काम करण्यासाठी स्थानिक मजूर मिळत नसल्याने परप्रांतीय भय्यांवरच अवलंबून राहावे लागते. साधारणतः एका भय्याला महिन्याला सरासरी १५ ते २० हजार रुपये पगार द्यावा लागतो.
गुऱ्ळहाळघरावरही आता स्थानिक मजूर मिळत नसल्याने परप्रांतीय मजुरांचा आधार घ्यावा लागत आहे. हळूहळू ही संख्या वाढत आहे.
'अरुणकुमार' काढतो अर्धा तासात १०० लिटर दूध
◼️ शिरोली दुमाला येथील विक्रम माळी यांच्या गोठ्यात अरुणकुमार रॉय हा भय्या गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहे.
◼️ माळी यांच्या गोठ्यात १५ म्हशी आणि १२ जातिवंत रेड्या आहेत.
◼️ या २७ जनावरांचे संगोपन एकटा अरुणकुमार रॉय करतो.
◼️ विशेष म्हणजे या पंधरा म्हशींचे रोज १०० लिटर दूध तो एकटा तेही हाताने अवघ्या अर्धा ते पाऊण तासात काढतो.
अंगठ्याने नव्हे भय्या काढतात मुठीने धार
आपल्याकडील दूध उत्पादक साधारणतः म्हैस किंवा गायीच्या थानाला अंगठा लावून दूध काढतात; पण भय्या मुठीत धरून दूध काढत असल्याने त्याला गती अधिक असते.
असा असतो 'भय्यांचा' गोठ्यातील दिनक्रम
◼️ पहाटे तीन ते साडेचार : गोठ्यातील शेण काढून जनावरांसह गोठा स्वच्छ करणे.
◼️ पावणेपाच ते साडेसहा : धारा काढणे.
◼️ सकाळी सात ते नऊ : जनावरांना पशुखाद्य देऊन चारा घालणे.
◼️ दुपारी तीन ते रात्री नऊ : गोठ्यातील शेण काढण्यापासून रात्रीचा चारा घालण्यापर्यंत काम.
दूध व्यवसाय कष्टाचा असून, गोठ्यातील नियोजनाबरोबर दूध संस्थेकडे पाठविणे, वैरण या गोष्टी कुटुंबातील सदस्य करू शकत नाहीत. आपल्यापेक्षा 'भय्या' लोकांची काम करण्याची क्षमता अधिक असते. - विक्रम माळी, गोठा मालक, शिरोली दुमाला
अधिक वाचा: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेत 'हा' महत्वपूर्ण बदल; आता लाभ लगेच मिळणार
