Ganesh Chaturthi 2020 : Reason behind we cover lord Ganesha idol's face whe bring it home | Ganesh Chaturthi 2020 : बाप्पाचा चेहरा झाकावा का?.... शास्त्र काय सांगतं...

Ganesh Chaturthi 2020 : बाप्पाचा चेहरा झाकावा का?.... शास्त्र काय सांगतं...

कोरोना व्हायरसमुळे अजूनही सगळं काही विस्कळीतच आहे. अशातही आपापल्या घरी गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. गणेशोत्सबाबत अनेक रितीरिवाज आहेत. पण हे कसे सुरू झाले किंवा त्यांची मान्यता काय आहे याबाबत फारसं कुणाला माहीत नसतं. आपण नेहमीच बघत असतो की, गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा घरी आणली जाते, तेव्हा मूर्तीचा चेहरा कापडाने झाकलेला असतो. अनेकांना गणपती बाप्पांना घरी कसे आणायचे? त्यांचा चेहरा का झाकायचा? गणपती बाप्पांना देखील दृष्ट लागते का? असे प्रश्न पडतात. पण यामागचं कारण काय आहे? चला जाणून घेऊ या प्रथेबाबत...

चेहरा झाकणं गरजेचं आहे का?

पुणे शहरातील वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी सांगितले की, गणेशाची मूर्ती दुकानातून घेतल्यावर ती जागा मोकळी न ठेवता तिथे पैसे आणि सुपारी ठेवण्याची पद्धत आहे. घरी आणताना मूर्तीचे तोंड आपल्याकडे करावे आणि विसर्जन करताना रस्त्याकडे तोंड करावे. मूर्ती आणताना ती कोणाच्या दृष्टीस पडू नये, असा मूर्ती झाकून आणण्यामागील भाव असतो. घराच्या दारात औक्षण करताना मूर्तीवरून कापड काढले जाते. मातीची मूर्ती असेल तर ती जपली जावी किंवा मूर्तीला कोणाची दृष्ट लागू नये, अशी मूर्ती झाकण्यामागील भावना असते. त्यामागे कोणतेही शास्त्र नाही, पण ती काळजी घेण्याची पद्धत आहे. गणेशाची प्राणप्रतिष्ठा सूर्योदयापासून दुपारी १ पर्यंत या कालावधीत अर्थात देवकाळात कधीही करता येऊ शकते. त्यासाठी विशिष्ट मुहूर्त पाहण्याची गरज नाही.

का झाकतात चेहरा?

असा समज आहे की, मूर्ती खूप सुंदर असेल तर लोक वाईट भावनेने तिच्याकडे बघू शकतात. मानवी भावनांचा परिणाम जड वस्तूंवरही होतच असतो. मूर्तीवर असला कोणताही वाईट परिणाम होऊ नये, हा त्यामागचा उद्देश असतो.

मूर्ती घरी आणताना काय करतात?

गणरायाची मूर्ती दुकानातून आणतांना डोक्यावर टोपी घालून जावे. तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. डोक्यावर काहीही न घालता पाहुण्याचे स्वागत करणे हा प्रकार आपल्या संस्कृतीला मान्य नाही. डोक्यावर काहीतरी घालून पाहुण्याचे स्वागत करणे हा त्या पाहुण्याचा सन्मान करण्याचा एक भाग आहे.

कधी आहे मुहूर्त?

भाद्रपद शुक्ल चतुर्थी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.५७ पर्यंत आहे. त्यामुळे याच दिवशी गणेश स्थापना करावयाची आहे. गणेश स्थापना मध्यान्हकाली करण्याची परंपरा आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.२५ पासून दुपारी १.५६ पर्यंत मध्यान्हकाली श्रीगणेशमूर्तीची स्थापना करावी, असे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले. ज्यांना या वेळेत गणेश स्थापना करता येणार नाही त्यांनी त्या दिवशी पहाटे पाचपासून दुपारी तीन वाजेपर्यंत गणेश स्थापना केली तरी चालेल. गणेशपूजनासाठी जेवढे साहित्य उपलब्ध होईल तेवढे वापरावे. जे नसेल त्या जागी अक्षता अर्पण कराव्या.

हे पण वाचा : 

Ganesh Chaturthi: गणपती स्थापनेसाठी सर्वोत्तम वेळ कोणती?... जाणून घ्या

Ganesh Chaturthi : गणपतीला २१ दुर्वांची जुडी का वाहतात?... अंक'शास्त्रा'मागे आहे अनलासुराच्या वधाची आख्यायिका

Hartalika Puja Vrat : ‘लव्ह मॅरेज’च्या जमान्यात हरतालिका व्रत कशासाठी?... समजून घ्या महती!


 

Web Title: Ganesh Chaturthi 2020 : Reason behind we cover lord Ganesha idol's face whe bring it home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.