वर्धेत परीक्षाच; पण कोण पास होणार? मोदींच्या सभेची प्रतीक्षा; वंचित, बसपाही निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 06:40 AM2024-04-18T06:40:45+5:302024-04-18T06:41:03+5:30

भाजपने तिसऱ्यांदा तडस यांना मैदानात उतरविले आहे.

Examination itself in Vardhe But who will pass Waiting for pm narendra Modi's meeting | वर्धेत परीक्षाच; पण कोण पास होणार? मोदींच्या सभेची प्रतीक्षा; वंचित, बसपाही निर्णायक

वर्धेत परीक्षाच; पण कोण पास होणार? मोदींच्या सभेची प्रतीक्षा; वंचित, बसपाही निर्णायक

रवींद्र चांदेकर, लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा
: महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाचे अमर काळे या नवख्या उमेदवाराने भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रामदास तडस यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. या दोघांच्या लढतीत बसपा आणि वंचितचे उमेदवार रंगत भरणार आहेत. शिवाय तडस यांची स्नुषाही मैदानात उभी ठाकली आहे. भाजपला सहज वाटणारी ही निवडणूक आता रंजक वळणावर पोहोचली असून, भाजप उमेदवारासाठी परीक्षाच आहे. भाजपने तिसऱ्यांदा तडस यांना मैदानात उतरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वलय असले तरी नाराजी दूर करण्यात ते कितपत यशस्वी होणार, हा कळीचा मुद्दा आहे.  

कुणबी आणि तेली हा जात फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार आहे. वंचित आणि बसपाचा उमेदवार किती मते खेचणार, यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. गेल्या निवडणुकीत या दोन उमेदवारांनी ७२ हजारांच्यावर मते घेतली होती. तडस यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. ‘महाविकास’च्या उमेदवारासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा, तर उद्धवसेनेचे आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. त्यानंतर चित्र कसे बदलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

वर्धेत पहिल्यांदाच पंजा गायब
आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार रिंगणात होता. मात्र, यावेळी प्रथमच काँग्रेसऐवजी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचा उमेदवार लढत आहे. त्यामुळे यंदा प्रथमच काँग्रेसचे ‘पंजा’ हे चिन्ह असणार नाही. त्याचा नेमका कुणाला लाभ हाेणार आणि कुणाला फटका बसणार, याच्या खुमासदार चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहेत. रामदास तडस आणि अमर काळे हे दोन्ही महत्त्वाचे उमेदवार तूर्तास पदयात्रा, रॅलीत, कॉर्नर सभांमध्ये व्यस्त आहेत. सध्या ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा उठला आहे.

गटातटांचा काय होणार परिणाम?
- महायुतीत सहभागी भाजप, अजित पवार गट, शिंदेसेना, आरपीआय (आठवले) गटात काही प्रमाणात कुरबुरी आहेत. अजित पवार 
गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी योगी यांच्या सभेत योग्य सन्मान न दिल्याचा मुद्दा थेट मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचा घाट घातला आहे. 
- महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने उमेदवाराच्या पाेस्टरवर सहसंर्पक प्रमुख आणि जिल्हाप्रमुखांचे छायाचित्र नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या सर्वांचा परिणाम दोन्ही उमेदवारांवर कितपत होतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे.

एकूण मतदार    १६,७४,८८३ 
पुरुष - ८,५४,९०३ 
महिला - ८,१९,९६७
 
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुनीत वर्धा लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत कधीच जाती, पातींना थरा नव्हता. मात्र, गेल्या काही निवडणुकीत जातीय फॅक्टर महत्त्वाचा आहे. कुणबी आणि तेली मतदारांची संख्या जादा आहे. हेच मतदार दोन्ही उमेदवारांसाठी निर्णायक ठरतील.
दहा वर्षांत मतदारसंघात कोणताही मोठा उद्योग आला नाही. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेतीमालाला वाजवी दर मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहे. त्यात भाजपने जुनाच चेहरा रिंगणात उतरविला आहे.
यंदा प्रथमच काँग्रेसचा उमेदवार मैदानात नाही. काँग्रेसच्या माजी आमदार असलेले काळे यांना ऐनवेळी पक्षात घेऊन शरद पवार गटाने उमेदवारी दिली.

२०१९ मध्ये काय घडले?
रामदास तडस    भाजप (विजयी)    ५,७८,३६४
चारुलता टोकस    काँग्रेस    ३,९१,१७३
शैलेशकुमार अग्रवाल बसपा    ३६,४२३
नोटा    -    ६,५१०

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते     

२०१४    रामदास तडस     भाजप    ५,३७,५१८
२००९    दत्ता मेघे    काँग्रेस    ३,५२,८५३     
२००४    सुरेश वाघमारे    भाजप    २,६९,०४५      
१९९९    प्रभा राव    काँग्रेस    २,४९,५६४     
१९९८    दत्ता मेघे    काँग्रेस    ३,२८,९०५     

Web Title: Examination itself in Vardhe But who will pass Waiting for pm narendra Modi's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.