उत्तराखंडमधील राजकीय समीकरणे बसप घडविणार की बिघडवणार? दरवेळी राहिला तिसऱ्या क्रमांकावर, यंदा काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:13 AM2024-04-01T10:13:17+5:302024-04-01T10:14:17+5:30

Uttarakhand Lok Sabha Election 2024: उत्तराखंडमधून बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाचा आतापर्यंत एकही खासदार निवडून आलेला नाही, पण म्हणून या राज्यातील निवडणुकीत बसपचे महत्त्व कमी होत नाही.

Uttarakhand Lok Sabha Election 2024: Will BSP make or break political equations? Every time he stayed at the third place, what about this year? | उत्तराखंडमधील राजकीय समीकरणे बसप घडविणार की बिघडवणार? दरवेळी राहिला तिसऱ्या क्रमांकावर, यंदा काय?

उत्तराखंडमधील राजकीय समीकरणे बसप घडविणार की बिघडवणार? दरवेळी राहिला तिसऱ्या क्रमांकावर, यंदा काय?

- ललित झांबरे
 डेहराडून - उत्तराखंडमधून बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाचा आतापर्यंत एकही खासदार निवडून आलेला नाही, पण म्हणून या राज्यातील निवडणुकीत बसपचे महत्त्व कमी होत नाही. कारण देवभूमीतील लोकसभा निवडणुकीत प्रत्येकवेळी बसपाने दखल घेण्याइतपत मते मिळवली आहेत आणि त्यामुळे इथल्या इतर पक्षांच्या उमेदवारांच्या जय-पराजयाची समीकरणे बदलली आहेत. यावेळीसुद्धा बसपाने पाच ही मतदारसंघांत आपले उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये यावेळी तिरंगी लढती रंगणार आहेत. 

उत्तराखंडमधील पाचपैकी दोन मतदारसंघांत याच्यापूर्वी बसपाच्या उमेदवाराला विजयाच्या अंतराच्या मतांपेक्षा अधिक मते मिळालेली आहेत. देवभूमीत बसपा हा नेहमीच मतांची टक्केवारी आणि यशाच्या प्रमाणात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. 

या राज्यात २००२ मध्ये पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी बसपने १०.७९ टक्के मते मिळवत सात जागांवर यशसुद्धा मिळवले होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी बसपाला मिळालेल्या मतांचे प्रमाण ६.७७ टक्के होते. 

जिंकण्याची शक्यता नसली तरी निकालावर असेल प्रभाव
- उत्तराखंडच्या लोकसभा निवडणुकांमध्ये बसपने मिळविलेल्या मतांचे प्रमाण २००४ मध्ये ६.८ टक्के, २००९ मध्ये १५.२ टक्के, २०१४ मध्ये ४.८ टक्के आणि २०१९ मध्ये ५.३ टक्के राहिले आहे. 
- ही टक्केवारी नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखी नाही म्हणूनच यावेळी बसपाने पुन्हा एकदा पाचही मतदारसंघांत उमेदवार उतरवले आहेत. ते जिंकून येण्याची शक्यता फारच कमी असली तरी कोण जिंकून येणार या समीकरणावर ते निश्चितपणे प्रभाव पाडणार आहेत.

असा हाेता बसपचा इम्पॅक्ट
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाचे पाचही जागांवर उमेदवार होते. त्यावेळी तेहरी गढवाल मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार ५२ हजार मतांनी जिंकला होता, पण याच मतदारसंघात बसपा उमेदवाराला ७४ हजार मते मिळाली होती. गढवालमध्येही असेच घडले होते.
काँग्रेसचे विजयाचे अंतर १७ हजार आणि बसप उमेदवाराची मते ३४ हजारांच्यावर होती. हरिद्वार मतदारसंघात तर बसप उमेदवाराने १ लाख ८१ हजार मते मिळवली होती.
नैनितालमध्ये त्यांना १ लाख ४३ हजार आणि अल्मोडा मतदारसंघात ४४ हजार मते मिळाली होती. प्रत्येक ठिकाणी बसपाला प्राप्त मते विजयाच्या अंतरापेक्षा अधिक होती. 

Web Title: Uttarakhand Lok Sabha Election 2024: Will BSP make or break political equations? Every time he stayed at the third place, what about this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.