ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 13, 2024 04:32 PM2024-05-13T16:32:26+5:302024-05-13T16:32:42+5:30

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे.

Voting message is given at every experiment in Thane | ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश

ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश

ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीत २० मे रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे याबद्दल ठाणे महानगरपालिका विविध उपक्रमांमधून जागृती करत आहे. याच उपक्रमात ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे हजारो नाट्यरसिकांना मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली जात आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे. गडकरी रंगायतनची आसन क्षमता एक हजार प्रेक्षकांची आहे. तेथे दररोज किमान दोन नाटकांचे प्रयोग होतात. शनिवार-रविवारी हे प्रमाण तीन प्रयोगापर्यंत जाते. तर, घाणेकर नाट्यगृहाची आसनक्षमता ११०० प्रेक्षकांची आहे. येथे दररोज किमान एक प्रयोग होतो तर, शनिवार-रविवारी किमान दोन प्रयोग होतात. घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्येही प्रयोग होतात. या प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे.

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेद्वारेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया,आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे. त्याचबरोबर, मिनी मॅरेथॉन आणि फ्लॅश मॉबच्या माध्यमातूनही मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला आहे.

Web Title: Voting message is given at every experiment in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.