नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध; नाईक समर्थकांचा राजीनामा देण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 03:42 PM2024-05-02T15:42:52+5:302024-05-02T15:43:10+5:30

Naresh Mhaske : शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.

Thane Loksabha Election BJP workers shouting slogans in front of Naresh Mhaske | नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध; नाईक समर्थकांचा राजीनामा देण्याचा इशारा

नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध; नाईक समर्थकांचा राजीनामा देण्याचा इशारा

Thane Loksabha Election : शिंदे गटाने ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याने नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले आहे. संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्याने प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नवी मुंबईतील भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी बोलवलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आपले राजीनामे देण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचे काम देखील करणार नसल्याची भूमिका भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतली.

भाजपकडून ठाण्यात आधी संजीव नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. भाजपलाच ठाण्याची जागा मिळणार असल्याचेही जवळपास निश्चित झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे संजीव नाईक यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र शिवसेनेनं ठाण्याची जागा आपल्याकडेच ठेवत नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र या सगळ्या निर्णयानं नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. याचाच प्रत्यय गणेश नाईक यांनी बोलवलेल्या बैठकीत आला आहे. निवडणुकीत म्हस्के यांचे काम करणार नसल्याचे सांगत भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे गणेश नाईक यांच्याकडे सोपवण्याची तयारी केली आहे.

"भाजप कार्यकर्त्यांना ही जागा अपेक्षीत होती. पक्षश्रेष्ठींकडून काही वाटीघाटी झाल्या असतील. पण नवी मुंबई शहराच्या अनुषंगाने आम्ही गणेश नाईक यांच्याकडे विनंती केली. मात्र ते आमच्या मताशी सहमत नाहीत. त्यामुळे उमेदवाराचा चेहरा व्यवस्थित नसल्याने काम करण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आम्ही राजीनाम्याचा निर्णय घेतला. नगरसेवकाला खासदारकी दिल्यामुळे नवी मुंबईतली जनता वैतागली आहे. संजीव नाईक हे चांगले नेतृत्व असताना कुठेतरी दबावतंत्र वापरलं जात आहे. याच्या विरोधात राजीनामे देत आहोत," असे कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

गेले कित्येक दिवस ठाण्याच्या जागेचा तिढा सुटत नव्हता. ठाण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र शेवटी मुख्यमंत्र्‍यांनी ठाण्यावर आपला हक्क सांगत नरेश म्हस्केंना उमेदवारी दिली. दुसरीकडे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर होताच प्रतिस्पर्धी असलेल्या ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा मार्ग सोपा झाल्याचं म्हटलं जात आहे. म्हस्केंची उमेदवारी जाहीर होण्यात बराच वेळ गेला असल्याने राजन विचारेंनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अशातच आता भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्यांमुळे म्हस्केंसाठी ही लढाई कठीण होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Thane Loksabha Election BJP workers shouting slogans in front of Naresh Mhaske

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.