कपिल पाटील यांच्या मिरवणुकीत सेनेचा टक्का कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 12:14 AM2019-04-09T00:14:46+5:302019-04-09T00:18:07+5:30

भिवंडीत भाजपचे शक्तिप्रदर्शन : पक्षाचे झेंडेही शिवसैनिकांनी उचलले नाहीत, श्रमजीवी संघटनेच्या महिलांची लक्षणीय उपस्थिती

Kapil Patil's rally has reduced the shiv sena's percentage | कपिल पाटील यांच्या मिरवणुकीत सेनेचा टक्का कमी

कपिल पाटील यांच्या मिरवणुकीत सेनेचा टक्का कमी

Next

भिवंडी : भिवंडी लोकसभा निवडणुकीतील भाजप, शिवसेना, आरपीआय (आ) व श्रमजीवी संघटनेच्या महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सोमवारी भाजप कार्यकर्त्यांची मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज सादर केला. या मिरवणुकीत शिवसेनेचे मोजकेच पदाधिकारी सहभागी झाले होते.


शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्या मिरवणुकीस शिवाजी चौक येथून सोमवारी दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. याप्रसंगी काढलेल्या प्रचाररथात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह शिवसेना आमदार रूपेश म्हात्रे, शांताराम मोरे, भाजपा आमदार महेश चौघुले, आ. नरेंद्र पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शहरप्रमुख सुभाष माने, माजी आमदार विवेक पंडित, दौलत दरोडा यांच्यासह भाजपाचे व सेनेचे मोजके पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी गोकुळनगर भागातील जैन मंदिराचे दर्शन घेऊन पाटील मार्गस्थ झाले.


ही मिरवणूक वंजारपाटीनाकामार्गे प्रांत कार्यालयातील मुख्य निवडणूक कार्यालयात पोहोचली. तिथे निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे यांच्याकडे कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड यासह भिवंडी शहर व ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्ते, श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते, आरपीआयचे कार्यकर्ते असे सुमारे १० हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते या मिरवणुकीत सामील झाले होते.

मिरवणुकीत सामील होणाऱ्या शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांसाठी शिवाजी चौकात भाजप व शिवसेनेचे झेंडे ठेवले होते. त्यावेळी भाजप कार्यकर्ते लगेचच झेंडे हाती घेऊन मिरवणुकीत सामील झाले; मात्र शिवसेनेचे मोजकेच कार्यकर्ते झेंडे घेण्यासाठी पुढे आले. त्यामुळे मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर शिवसेनेचे बरेच झेंडे तसेच राहिले. विशेष म्हणजे, श्रमजीवी संघटनेच्या महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सामील झाल्या होत्या. त्यांनी श्रमजीवीचे झेंडे हाती घेतले होते.

मिरवणुकीत कल्याण, शहापूर व विरार येथील ढोल पथके सामील झाले होते. त्यावर, श्रमजीवीच्या काही महिलांनी ठेका धरला होता. मिरवणूक वाजतगाजत निवडणूक कार्यालयात गेली. मात्र, मिरवणुकीत घोषणांचा दुष्काळ पडला होता. कडक उन्हात मिरवणूक निघाल्याने कार्यकर्ते अक्षरश: भाजून निघाले.
ठिकठिकाणी लहान, मोठी वाहने उभी असल्याने काही ठिकाणी मिरवणुकीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे शालेय बसनादेखील वेळेवर विद्यार्थ्यांना पोहोचवता आले नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

Web Title: Kapil Patil's rally has reduced the shiv sena's percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.