लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरच ठरणार आमदारांच्या तिकिटाचे भवितव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:42 AM2019-04-16T00:42:17+5:302019-04-16T00:42:47+5:30

लोकसभा निवडणुकीत तुमच्या विधानसभा मतदारसंघात मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले, तरच तुमचे तिकीट पक्के, असा दम भाजप-शिवसेना या पक्षांच्या नेतृत्वाने आपल्या आमदारांना भरला असल्याने बहुतांश आमदार आता प्रचारात सक्रिय झाले आहेत.

Future of the tickets of MLAs will be on the performance of the Lok Sabha elections | लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरच ठरणार आमदारांच्या तिकिटाचे भवितव्य

लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरच ठरणार आमदारांच्या तिकिटाचे भवितव्य

- अजित मांडके 

ठाणे : लोकसभा निवडणुकीत तुमच्या विधानसभा मतदारसंघात मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले, तरच तुमचे तिकीट पक्के, असा दम भाजप-शिवसेना या पक्षांच्या नेतृत्वाने आपल्या आमदारांना भरला असल्याने बहुतांश आमदार आता प्रचारात सक्रिय झाले आहेत. युतीमधील मतभेद मिटवून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रचारात उतरवण्याकरिता हा जमालगोटा पक्षनेतृत्वाने स्वपक्षीय आमदारांना दिल्याचे समजते.

अनेक मतदारसंघांत खासदार व आमदार यांच्यातही वादविवाद असतात. तेच खालपर्यंत झिरपल्याने गटातटांचे राजकारण सुरू होते. एखाद्या मतदारसंघात खासदार शिवसेनेचा व आमदार भाजपचा असेल, तर तेथेही वाद व वर्चस्वाची लढाई सुरू असते. या मतभेदांचाच फटका बसण्याची चिन्हे दिसल्याने आता पक्षनेतृत्वाने आमदारांचे लोकसभा निवडणुकीतील प्रगतीपुस्तक पाहून उमेदवारी द्यायची किंवा कसे, हे ठरवण्याचे निश्चित केले आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सहा विधानसभा मतदारसंघांतून किती मताधिक्य मिळते, त्यावर विधानसभेची गणिते ठरवली जाणार आहेत. बहुतांश विधानसभा मतदारसंघांत नगरसेवक किंवा जिल्हाप्रमुख किंवा जिल्हाध्यक्ष हेही विधानसभा लढवण्याकरिता इच्छुक असतात. त्यामुळे आपली विधानसभा मतदारसंघावरील पकड टिकवायची, तर लोकसभेला गतवेळीपेक्षा अधिक मते उमेदवाराला मिळाली पाहिजेत, याकरिता आमदार कामाला लागले आहेत. तसेच माजी आमदारसुद्धा जोमाने कामाला लागल्याचे चित्र प्रत्येक मतदारसंघात दिसून येत आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. ही निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी मानली जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला किती मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या स्वपक्षाच्या उमेदवाराला किती मते मिळाली.

महापालिका निवडणुकीत त्या विधानसभा मतदारसंघातील प्रभागात पक्षाची काय कामगिरी होती व आता लोकसभा निवडणुकीत काय चित्र राहते, याचा सारासार विचार करून उमेदवार दिले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही लोकसभेची कामगिरी हा निकष लावला जाणार असल्याचे समजते. भाजपमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांची एक कार्यपद्धती आहे. परराज्यांतील त्यांचे खास विश्वासू निरीक्षक प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रचाराबाबत माहिती घेऊन शहा यांना अहवाल देतात. त्या मतदारसंघातील काही प्रतिष्ठित मंडळींकडूनही शहा माहिती घेतात. त्यामुळे भाजपमध्ये आमदारांच्या कामगिरीचे बारकाईने अवलोकन केले जाते. समजा, शिवसेनेचा आमदार असेल, तर तेथे मित्रपक्षाने किती मदत केली, याचाही हिशेब ठेवला जातो. विधानसभा निवडणूक युती करून लढवायची ठरले, तर भाजप शिवसेनेच्या नेतृत्वालाही आपल्याकडील माहिती देऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आमदारांनी किती सहकार्य केले, यावर थेट शरद पवार यांचे बारीक लक्ष असते. सध्या ठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार संजय केळकर हे जवळजवळ प्रत्येक प्रचार रॅली आणि सभांना हजर राहताना दिसत आहेत. केळकर हे आपली विधानसभेची गणिते आतापासूनच बांधत आहेत. दुसरीकडे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांना प्रत्येक प्रचारफेरीत सहभागी राहण्यास सांगितले आहे.

>आधी सेनेशी संघर्ष, आता सेनेसाठीच सर्वस्व

ओवळा-माजिवडा मतदारसंघात आमदार सरनाईक हे विचारे यांना आघाडी देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु, मीरा-भार्इंदरमधून सेनेच्या उमेदवाराला अधिकची मते कशी मिळतील, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असून यावरच त्यांचे विधानसभेचे गणित पक्के होणार आहे. मागील निवडणुकीत मीरा-भार्इंदरने सेनेला पिछाडीवर टाकले होते, तर ठाण्याने आघाडी दिली होती. मीरा-भार्इंदर मतदारसंघात भाजपचे आमदार मेहता यांचा आतापर्यंत सेनेशी संघर्ष झाला असला, तरी आता त्यांच्यावरही सेनेच्या उमेदवाराकरिता सर्व शक्ती पणाला लावणे बंधनकारक आहे. पक्षाने दिलेल्या तंबीचा धसका जवळपास सर्वच आमदारांनी घेतला होता. त्यामुळे आतापर्यंत प्रचारातून अंग काढू पाहणारे आमदार आता प्रचारकामाला भिडले आहेत. पुन्हा आमदारकी मिळवायची असेल, तर लोकसभा गाजवण्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांना समजून चुकलं आहे.नवी मुंबईत पुन्हा एककलमी सत्ता संपादित करण्यासाठी आणि हातून निसटलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गणेश नाईक फॅमिलीने डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघांतून पुन्हा मतांचे निर्विवाद वर्चस्व राष्टÑवादीचे लोकसभेचे उमेदवार आनंद परांजपे यांना देण्यासाठी नाईक कुटुंबीय जोमाने मैदानात उतरले आहे. बेलापूरमध्ये भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे असून त्यासुद्धा शिवसेनेसाठी मतांचा जोगवा मागत आहेत.

Web Title: Future of the tickets of MLAs will be on the performance of the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.