बाळ्यामामांना काँग्रेसश्रेष्ठींचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 11:37 PM2019-04-09T23:37:12+5:302019-04-09T23:37:30+5:30

उमेदवारीवरून दोन गट । निष्ठावंतांना डावलण्यास झाला विरोध

Congratulations to the Congress | बाळ्यामामांना काँग्रेसश्रेष्ठींचा विरोध

बाळ्यामामांना काँग्रेसश्रेष्ठींचा विरोध

googlenewsNext

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा सुरेश टावरे यांना उमेदवारी द्यायची की, शिवसेनेतून सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना काँग्रेसमध्ये आणून त्यांच्या ओंजळीत उमेदवारी टाकायची, यावरून काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. टावरे हे काँग्रेसमध्ये असून म्हात्रे यांच्याइतके ते दलबदलू नाहीत, त्यामुळे त्यांनाच उमेदवारी देण्याची बाब पक्षश्रेष्ठींच्या गळी उतरवण्यात काँग्रेसमधील एक गट यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी सकाळी टावरे यांच्या हातात ‘ए’ व ‘बी’ फॉर्म सोपवले गेले.


काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टावरे हे खासदार असताना काँग्रेस पक्षाकरिता त्यांनी पुरेसे सहकार्य केले नसल्याने येथील उमेदवार बदलावा, अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची इच्छा होती.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी ग्रामीण, मुरबाड या मतदारसंघात काँग्रेस कमकुवत असून शहापूरमध्ये काँग्रेसची स्थिती बेताची आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची बरी स्थिती असून भिवंडी शहरावर काँग्रेसची भिस्त आहे. मात्र, भिवंडी शहरातील काँग्रेसच्याच नगरसेवकांनी टावरे यांना उमेदवारी देण्यास विरोध केल्याने उमेदवार बदलाच्या मागणीला गती प्राप्त झाली.


भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना दुखावल्याने तेथे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली, तर भाजपला मतदारसंघ जिंकणे कठीण होईल, अशी चव्हाण यांची अटकळ होती. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून कपिल पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व जितेंद्र आव्हाड हेही सुरेश म्हात्रे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी, याकरिता आग्रही होते, असे समजते.
काँग्रेसने हिंगोली, चंद्रपूर या मतदारसंघांत अन्य पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी दिली. पुणे मतदारसंघात संजय काकडे, तर जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर यांना आणि त्याचबरोबर भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्याकरिता चव्हाण आग्रही होते. काँग्रेसमधील एका गटाने याला विरोध केला. भाजप आयारामांना उमेदवारी देत असल्याबद्दल आपण त्यांच्यावर टीका करत आहोत. मात्र, आपणही तेच केले तर निष्ठावंत कार्यकर्ते बिथरतील व आपल्यावरही तीच टीका होईल, अशी भूमिका या गटाने घेतली. पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व अन्य नेत्यांपर्यंत हीच भूमिका मांडली गेली. म्हात्रे हे आतापर्यंत वेगवेगळे पक्ष फिरून आले आहेत.


काँग्रेसची उमेदवारी घेऊन ते विजयी झाले, तरी ते काँग्रेससोबत एकनिष्ठ राहतील, याची कोणतीही खात्री नाही, असा युक्तिवाद त्यांच्या उमेदवारीबाबत विरोधी गटाकडून केला गेला. म्हात्रे यांचे भिवंडीतील बेकायदा गोदामांशी जोडले गेलेले हितसंबंध व त्यांची या परिसरातील दहशत यासारखे मुद्देही दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या कानांवर घातले गेले. त्यामुळे अखेरीस म्हात्रे यांचा पत्ता कापला जाऊन टावरे यांनाच उमेदवारी देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
दरम्यान, म्हात्रे यांनी राज्यातील नेत्यांकडून उमेदवारी मिळत नसल्याने केंद्रातील एका नेत्याला हाताशी धरून उमेदवारीकरिता खटपट केली. यामुळे राज्यातील ज्या नेत्याने त्यांच्या उमेदवारीकरिता दिल्लीत शब्द टाकला होता, तो नेताही नाराज झाला. पक्षश्रेष्ठींचे मत म्हात्रे यांच्याबाबत अनुकूल नसल्याचे लक्षात येताच दिल्लीतील नेत्याने म्हात्रे यांचे नाव रेटले नाही आणि राज्यातील नेत्यानेही म्हात्रे यांची पाठराखण करणे सोडून दिले, ही बाबदेखील टावरे यांच्या पथ्यावर पडल्याची आणखी एक चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू होती.
 

सुरेश टावरे यांची उमेदवारी २२ मार्च रोजी जाहीर झाली होती. परंतु, काँग्रेस पक्षातील काही नगरसेवकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. श्रेष्ठींकडेही पत्रव्यवहार केला होता. यामुळे श्रेष्ठी द्विधा मन:स्थितीत होते. त्यानंतर, सर्व्हे करण्यात आला. टावरे यांनाच उमेदवारी दिली तर ते निवडून येतील, असे सर्व्हेत स्पष्ट झाले. त्यामुळे अखेर टावरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बाळ्यामामाला उमेदवारी मिळावी, यासाठी कोण लॉबिंग करत होते, यावर सध्या तरी भाष्य करू शकत नाही. काँग्रेसचे जे नगरसेवक नाराज होते, त्यांची समजूत काढली असून त्यांनी टावरे यांच्यासाठी काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
- सुभाष कानडे, प्रभारी, भिवंडी लोकसभा मतदारसंघ

Web Title: Congratulations to the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.