ठाण्यात भाजप मैत्रिपूर्ण लढतीच्या तयारीत?

By अजित मांडके | Published: April 5, 2024 01:34 PM2024-04-05T13:34:31+5:302024-04-05T13:36:22+5:30

ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित होत नसताना भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदारसंघात ‘शत-प्रतिशत भाजप’चा दावा केल्याने भाजप ठाण्यात शिंदेसेनेबरोबर मैत्रिपूर्ण लढतीच्या मन:स्थितीत आहे का, अशी चर्चा सुरू आहे.

BJP preparing for a friendly fight in Thane? | ठाण्यात भाजप मैत्रिपूर्ण लढतीच्या तयारीत?

ठाण्यात भाजप मैत्रिपूर्ण लढतीच्या तयारीत?

- अजित मांडके
ठाणे - ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित होत नसताना भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदारसंघात ‘शत-प्रतिशत भाजप’चा दावा केल्याने भाजप ठाण्यात शिंदेसेनेबरोबर मैत्रिपूर्ण लढतीच्या मन:स्थितीत आहे का, अशी चर्चा सुरू आहे. ठाणे लोकसभा भाजपलाच का मिळावा, याची काही महत्त्वाची कारणे भाजप पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली.  त्यामुळे ठाण्यावरून शिंदेसेना व भाजपमधील रस्सीखेच तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.

ठाणे आणि कल्याणचे उमेदवार अद्याप शिवसेनेकडून जाहीर झालेले नाहीत. ठाणे लोकसभा शिवसेनाच लढणार असल्याचे शिंदेसेनेकडून ठासून सांगितले जाते. परंतु, भाजपकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी दबाव वाढविला जात आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कळवा, ठाण्यातील फेसबुकवर ‘शत- प्रतिशत भाजप’ अशा पोस्ट गुरुवारी करण्यात आल्या. बुधवारी महायुतीचा संयुक्त मेळावा झाला. त्यामध्ये ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आपले उमेदवार असल्याचा राग महायुतीच्या नेत्यांनी आळवला. लागलीच दुसऱ्याच दिवशी ठाण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी शत-प्रतिशत भाजपचा नारा दिल्याने शिंदेसेना ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडत नसेल, तर शिंदेसेनेच्या विरोधात ठाण्यात मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत भाजप देत असल्याची चर्चा सुरू झाली. 

भाजपचा दोन जागांसाठी प्रयत्न
भाजपची ताकद केवळ ठाणे शहरात नव्हे तर, जिल्ह्यातही वाढत आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपचे १२ आमदार आहेत. त्यात विधानसभेचे ९ आणि विधान परिषदेच्या ३ आमदारांचा समावेश आहे. याशिवाय नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचेच वर्चस्व आहे. ठाण्यातही भाजप कुठेही कमी नसल्याचा दावा भाजपच्या स्थानिक मंडळींकडून केला जात आहे. ठाणे जिल्ह्यात किमान दोन जागा भाजपला मिळाव्यात, असा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यामुळेच भिवंडीनंतर ठाण्यासाठी भाजपच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. 

Web Title: BJP preparing for a friendly fight in Thane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.