bigg boss marathi season 2 shoot in Mumbai film city? | बिग बॉस मराठीचे चित्रीकरण लोणावळा नव्हे तर होणार या ठिकाणी?
बिग बॉस मराठीचे चित्रीकरण लोणावळा नव्हे तर होणार या ठिकाणी?

ठळक मुद्देया कार्यक्रमाचे चित्रीकरण हे मुंबई फिल्मसिटी मध्ये होणार आहे. लवकरच या कार्यक्रमाचा सेट तिथे उभारण्यात येणार आहे. या आधी बिग बॉस मल्याळमचे चित्रीकरण येथे करण्यात आलेले आहे.

वाद, विरोध, प्रेम, मैत्री अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोच्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाची टीम जोरदार कामाला लागली आहे.

बिग बॉस या कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्याच सिझनला प्रेक्षकांचे खूपच चांगले प्रेम मिळाले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. याच कार्यक्रमाच्या धर्तीवर आपल्याला बिग बॉस मराठी पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमाचे विजेतेपद मेधा धाडेने पटकावले होते.

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे चित्रीकरण लोणावळ्यात झाले होते. पण यंदाच्या सिझनमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमाचे चित्रीकरण हे मुंबई फिल्मसिटी मध्ये होणार आहे. लवकरच या कार्यक्रमाचा सेट तिथे उभारण्यात येणार आहे. या आधी बिग बॉस मल्याळमचे चित्रीकरण येथे करण्यात आलेले आहे. मुंबईत चित्रीकरण करणे हे सोयीस्कर असल्याने बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या टीमने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या कार्यक्रमात कोणकोणते स्पर्धक असणार याबाबत देखील त्यांनी वृत्त दिले आहे. त्यांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे की, राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या कार्यक्रमातील शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपाणकर, गौतम जोगळेकर हे कलाकार बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 

माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनीलला देखील बिग बॉस मराठी या कार्यक्रमासाठी विचारण्यात आले होते. रसिकानेच याबाबत नुकताच खुलासा केला होता. बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. आता दुसऱ्या सिझनमध्ये देखील तेच या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार असल्याचे म्हटले जात आहे.


Web Title: bigg boss marathi season 2 shoot in Mumbai film city?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.