जिल्हा परिषदेचा डंका : सातारचे ‘मिशन धाराऊ’ महाराष्ट्रात पोहोचणार

By नितीन काळेल | Published: February 8, 2024 09:17 PM2024-02-08T21:17:21+5:302024-02-08T21:21:04+5:30

आदिती तटकरे यांच्याबरोबर बैठक; अधिकाऱ्यांना सूचना

Zilla Parishad: Satar's 'Mission Darau' will reach Maharashtra | जिल्हा परिषदेचा डंका : सातारचे ‘मिशन धाराऊ’ महाराष्ट्रात पोहोचणार

जिल्हा परिषदेचा डंका : सातारचे ‘मिशन धाराऊ’ महाराष्ट्रात पोहोचणार

सातारा: जन्मानंतर एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाचे प्रमाण वाढविणे, बाळाच्या सहा महिन्यांनंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराचे प्रमाण वाढविण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने ‘मिशन धाराऊ माता दुग्धामृतम्’ अभियान सुरू केले होते. या अभियानाचे यश पाहून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे अभियान राज्यात राबविण्याबाबत सूचना केली आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा डंका वाजणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून ‘मिशन धाराऊ’ हे अभियान २०२१ मध्ये सुरू केले होते. यामधून जिल्ह्यात स्तनपान आणि शिशुपोषण विषयाची सामाजिक लोकचळवळ निर्माण करण्याचा उद्देश होता; कारण, बालकाच्या शारीरिक विकासात स्तनपानाची भूमिका मोलाची असते. परंतु, आजही समाजात याबाबत गैरसमजुती आणि कुप्रथा पाळल्या जातात. याचा परिणाम नंतर बालकांच्या वाढीवर होतो. यासाठी मार्गदर्शनाची गरज भासते. अशा प्रकारचे मार्गदर्शन सहज आणि सोप्या पद्धतीने होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ अभियान सुरू आहे. या अभियानाचा खूप चांगला फायदा झाला. तसेच उद्देशही सफल झाला आहे. त्यामुळे राज्यात हे अभियान राबविण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

मुंबईत मंत्रालयात याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीला सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे उपस्थित होत्या. यावेळी मंत्री तटकरे यांनी ‘मिशन धाराऊ’ तसेच अभियानाच्या यशाबद्दल माहिती घेतली. त्यानंतर या अभियानाचा उद्देश पाहून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याबाबत त्यांनी संबंधितांना सूचनाही केली आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने ‘मिशन धाराऊ’ अभियान राबविण्यात येत आहे. याचा फायदा गर्भवती महिला तसेच स्तनदा मातांना झालेला आहे. या अभियानाचा उद्देश सफल होऊन यशही मिळाले. त्यामुळे ही योजना आता राज्यात राबविली जाणार आहे, याचा आनंद होत आहे.- रोहिणी ढवळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

सातारा जिल्हा परिषदेने ‘मिशन धाराऊ’ हे अभियान सुरू केले आहे. यामधून जिल्ह्यात स्तनपान आणि शिशुपोषण विषयाची चळवळ निर्माण करण्याचा उद्देश होता. या अभियानाचा खूप चांगला फायदा झाला. तसेच उद्देशही सफल झाला आहे. त्यामुळे राज्यात हे अभियान राबविण्याचे नियोजित करण्यात आल्याने सातारा जिल्ह्याचा नावलाैकिक आणखी वाढला आहे.
- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Zilla Parishad: Satar's 'Mission Darau' will reach Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.