'मॉर्फ' केलेले अश्लील फोटो पाठवून विवाहितेकडे पैशाची मागणी

By संजय पाटील | Published: January 22, 2024 08:16 PM2024-01-22T20:16:37+5:302024-01-22T20:17:13+5:30

अज्ञातांवर गुन्हा दाखल : कर्जासाठी विवाहितेने पाठविला होता फोटो

Demand money from married couple by sending 'morphed' obscene photos | 'मॉर्फ' केलेले अश्लील फोटो पाठवून विवाहितेकडे पैशाची मागणी

'मॉर्फ' केलेले अश्लील फोटो पाठवून विवाहितेकडे पैशाची मागणी

कऱ्हाड : विवाहितेचे फोटो अश्लील पद्धतीने ‘मॉर्फ’ करीत ते ‘व्हायरल’ करून पैशांची मागणी करणाऱ्या अज्ञातांवर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एक विवाहिता खाजगी नोकरी करते. १७ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संबंधित विवाहिता तिचे फेसबुक पाहत असताना त्यावर त्वरित कर्ज मिळविण्याबाबतची एक ‘लिंक’ आली. विवाहितेने ती ‘लिंक’ तपासली असता, त्यामध्ये वीस हजार लोन देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार विवाहितेने आधारकार्ड, पॅनकार्ड आणि तिचा फोटो संबंधित लिंकवर पाठवला. तसेच एका कॉलममध्ये मोबाईल क्रमांकही भरला.

मात्र, काही वेळातच संबंधित विवाहितेच्या व्हॉट्सअपवर अनोळखी क्रमांकावरून तिचा चेहरा असलेला एक अश्लील फोटो आला. त्या फोटोवर अश्लील मजकूरही लिहिलेला होता. तसेच काही वेळातच अज्ञात क्रमांकावरून फोन आला. संबंधिताने हिंदीमध्ये बोलत विवाहितेकडे पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या विवाहितेने तो नंबर ‘ब्लॉक’ केला.

दरम्यान, याच कालावधीत वेगवेगळ्या आठ ते दहा क्रमांकावरून महिलेला फोन आला. काही वेळातच महिलेचा पती आणि तिच्या मित्राचाही फोन आला. त्या दोघांच्या व्हॉटस्अ‍ॅपला विवाहितेचे ‘मॉर्फ’ केलेले अश्लील फोटो आल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशीही विवाहितेला अनोळखी क्रमांकावरून वारंवार फोन येत होते. त्यामुळे याबाबत विवाहितेने कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Demand money from married couple by sending 'morphed' obscene photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.