सांगलीच्या राजकीय आखाड्यात आणखी एक 'पैलवान'; राजू शेट्टींनी जाहीर केला स्वाभिमानीचा उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:07 AM2024-04-12T11:07:02+5:302024-04-12T11:09:44+5:30

Raju Shetty: राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगलीच्या राजकीय आखाड्यात एंट्री झाली आहे.

Raju Shetty announced Swabhimani candidate for sangli lok sabha seat | सांगलीच्या राजकीय आखाड्यात आणखी एक 'पैलवान'; राजू शेट्टींनी जाहीर केला स्वाभिमानीचा उमेदवार

सांगलीच्या राजकीय आखाड्यात आणखी एक 'पैलवान'; राजू शेट्टींनी जाहीर केला स्वाभिमानीचा उमेदवार

Sangli Lok Sabha ( Marathi News ) :सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र महाविकास आघाडीत उमेदवारीवरून मोठा कलगीतुरा रंगला आणि अखेर ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्याचा निर्णय झाला. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने नाराज असलेले काँग्रेस नेते विशाल पाटील हे सध्या बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगलीच्या राजकीय आखाड्यात एंट्री झाली असून शेट्टी यांच्याकडून महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेल्याने काँग्रेसचे विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली आणि विशाल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर यंदा महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा, यासाठी आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात सांगली जिल्हा काँग्रेसने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र तरीही ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली. त्यामुळे नाराज झालेले विशाल पाटील हे अन्य पर्यायांच्या शोधात असताना स्वाभिमानीच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवण्याचाही पर्याय त्यांच्यासमोर होता. परंतु राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

राजू शेट्टी काय म्हणाले?

महेश खराडे यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, "आमचा उमेदवार फाटका माणूस असून गरीब शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे ही निवडणूक आम्ही 'एक व्होट एक नोट' या तत्त्वावर लढवणार आहोत. अनेक दिवसांपासून स्वाभिमानीचा जिल्हाध्यक्ष आणि कणखर नेता म्हणून खराडे यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. गेल्या निवडणुकीत आम्ही ही जागा लढवली होती. जवळपास साडेतीन लाख मते आम्हाला मिळवली होती. यावेळी त्यापेक्षा अधिक मते मिळवून महेश खराडे विजयी होतील," असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

विश्वजीत कदमांना अजूनही आशा

महाविकास आघाडीने जागावाटप जाहीर केलं असलं तरी सांगलीबाबत पुनर्विचार व्हावा, अशी काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांची मागणी आहे. "आजही सांगली जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची पारख करून पुन्हा या निर्णयाचा फेरविचार करावा ही आमची महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती आहे. ही माझी व्यक्तिगत नाही तर काँग्रेस पक्षाची भावना आहे. राज्य आणि देशात जे वातावरण आहे ते नाकारत नाही. परंतु काँग्रेस पक्षाची ही जागा असून मविआनं गांभीर्याने या जागेबाबत विचार करावा," अशी मागणी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे.
 

Web Title: Raju Shetty announced Swabhimani candidate for sangli lok sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.