Mogra Fulala Marathi film review:अनोख्या पध्दतीने गुंफलेली प्रेमकथा 'मोगरा फुलला'

By अजय परचुरे | Published: June 14, 2019 03:18 PM2019-06-14T15:18:37+5:302023-08-08T20:27:58+5:30

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका श्राबनी देवधर यांचा बऱ्याच वर्षांनी आलेला सिनेमा म्हणून रसिकांमध्ये मोगरा फुललाची जास्त उत्सुकता आहे.

Mogra Fulala Marathi film review | Mogra Fulala Marathi film review:अनोख्या पध्दतीने गुंफलेली प्रेमकथा 'मोगरा फुलला'

Mogra Fulala Marathi film review:अनोख्या पध्दतीने गुंफलेली प्रेमकथा 'मोगरा फुलला'

ठळक मुद्दे मोगरा फुलला ही त्याच पठडीतील प्रेमकहाणी आहे जी नाजूक नात्यांनी बांधली गेली आहे. आणि प्रेक्षकांना आवडण्यासारखी आहे.
Release Date: June 14,2019Language: मराठी
Cast: स्वप्नील जोशी,नीना कुळकर्णी,सई देवधर,संदीप पाठक,चंद्रकांत कुलकर्णी,आनंद इंगळे
Producer: अर्जुन सिंग बरन,कार्तिक निशाणदार Director: श्राबनी देवधर
Duration: 2 तास 19 मि.Genre:
लोकमत रेटिंग्स

अजय परचुरे 

नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा ही मोगरा फुललाची टॅगलाईन. या सिनेमात नायक आहे नायिका आहे. प्रेम आहे मात्र ही एक अत्यंत अनोख्या पध्दतीने मांडण्यात किंवा गुंफण्यात आलेली प्रेमकथा आहे. काही प्रेमकथा वरून जरी खूप साध्या सोप्प्या वाटत असल्या तरी जेव्हा या प्रेमकथांच्या आपण खोलात शिरतो तेव्हा त्यातील गुंतागुंत ,खाचखळगे ह्याचा प्रत्यय येतो. मोगरा फुलला ही त्याच पठडीतील प्रेमकहाणी आहे जी नाजूक नात्यांनी बांधली गेली आहे. आणि प्रेक्षकांना आवडण्यासारखी आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका श्राबनी देवधर ह्यांचा बऱ्याच वर्षांनी आलेला सिनेमा म्हणून रसिकांमध्ये मोगरा फुललाची जास्त उत्सुकता आहे.

सिनेमातील नायक अर्थात सुनिल कुलकर्णी (स्वप्निल जोशी) हा अत्यंत हुशार पण साधाभोळा व्यक्ती .सुनील कुलकर्णी आपल्या पारंपारिक जबाबदाऱ्यांमध्ये एवढा गुंतलेला आहे की, आपल्या लग्नाचे वय उलटून गेले आहे, हे त्याच्या लक्षातच येत नाही. आपली आई (नीना कुळकर्णी) हिच्या सांगण्यानुसार सुनील सर्व गोष्टी करत असतो. आईला जी मुलगी आवडेल त्याच मुलीशी लग्न करणार असा निर्णय त्याने घेतलेला असतो. आपल्या आईचा लाडका असण्याचे त्याला फायदेही होत असतात आणि तोटेही. अशातच सुनील एका स्वतंत्र आणि भक्कम व्यक्तिमत्त्वाच्या म्हणजेच बँक कर्मचारी असणाऱ्या शिवांगीच्या (सई देवधर) प्रेमात पडतो. आणि त्याला लग्नाबद्दलची जाणीव होते. तिच्याबद्दलचे त्याचे प्रेम जागृत होते. ते दोघेही खरेतर स्वतंत्र व्यक्तीमत्त्वांचे असतात. मात्र सुनीलला तिच्याशीच लग्न करायचं असतं. या सगळ्यात सुनिलच्या प्रेमाचा मोगरा फुलतो का ? त्याला शिवांगीचे प्रेम मिळतं का ? आणि आईचा कोणताही शब्द पाडू न देणारा सुनिल आईचं याबाबतीत ऐकतो का ? हे पाहण्यासाठी तुम्हांला हा सिनेमा पाहावा लागेल. मात्र एक अनोखी प्रेमकहाणी पाहावी अशी ही गोष्ट आहे. 

वेगळा लूक,उत्तम कलाकार ,दर्जेदार संगीत त्या जोडीला कसदार कथा आणि सर्वात उत्तम दिग्दर्शन या गोष्टींमुळे मोगरा फुलला अगदी जुळून आला आहे. श्राबनी देवधर ह्यांनी या सिनेमाची कथा अत्यंत वेगळ्या स्वरूपात मांडली आहे. स्वप्निल जोशी तसा चॉकलेट बॉय मात्र त्याला वेगळ््या रूपात दाखवून श्राबनी देवधर यांनी मोठी बाजी मारली आहे. सचिन मोटेंचे संवाद हा ही या सिनेमाचा एक प्राण आहे. स्वप्निल जोशीवर नेहमी आरोप होतो की तो लव्हबेल बॉयच्या इमेजमधून बाहेर पडत नाही .मात्र या सिनेमात स्वप्निल आपल्यावरील आरोपांना आपल्या भूमिकेतून चोख उत्तर दिलं आहे. साध्याभोळ्या सुनिल कुलकर्णीचं बेअरिंग स्वप्निलने पूर्ण सिनेमाभर अत्यंत उत्तम पकडलं आहे. सई देवधरचा तसा हा पहिलाच मराठी सिनेमा. तसं सईने आत्तापर्यंत हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत अत्यंत उत्तम रोल केले आहेत. मात्र शिवांगीची होणारी व्यथा ,तिची प्रेम आणि संसारात होणारी धडपड तिने अत्यंत उत्कटरित्या साकारली आहे. नीना कुळकर्णींनी स्वप्निलच्या आईच्या भूमिकेत कमाल केली आहे. मुलाविषयी असणारी कळकळ, त्याला आपल्या भावनांमध्ये गुंतवून ठेवणे हे नीना कुळकर्णींनी फार उत्तम साकारलं आहे. चंद्रकांत कुलकर्णी,आनंद इंगळे, विद्याधर जोशी ,समिधा गुरू या कलाकारांची उत्तम साथ आणि अदाकारी हे मोगरा फुलला मधील वैशिष्ठय आहे. सिनेमाचं संगीतही साजेसं झालं आहे. लिटील चॅम्पसमुळे आणि सध्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या गायक रोहित राऊतने या सिनेमाला संगीत दिलं आहे. मनमोहिनी,शंकर महादेवन यांच्या आवजातील मोगरा फुलला हे शीर्षक गीत तर फारच श्रवणीय झालं आहे. अनोखी प्रेमकहाणी पाहायची असेल तर मोगरा फुलला हा उत्तम पर्याय आहे.

Web Title: Mogra Fulala Marathi film review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.