Miss u Mister Marathi Film Review: सादरीकरणात हरवलेला 'मिस यू मिस्टर'

By अजय परचुरे | Published: June 27, 2019 10:25 AM2019-06-27T10:25:59+5:302019-06-27T13:47:10+5:30

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ मध्ये प्रमुख भूमिकेत आहेत.

Miss u Mister Marathi Film Review: Miss You Mister lost in the presentation | Miss u Mister Marathi Film Review: सादरीकरणात हरवलेला 'मिस यू मिस्टर'

Miss u Mister Marathi Film Review: सादरीकरणात हरवलेला 'मिस यू मिस्टर'

googlenewsNext
ठळक मुद्देमिस यू मिस्टर हा सिनेमा विषय जरी वेगळा असला तरी मांडणी आणि सादरीकरणामुळे ,आणि प्रसंगानुरूप येणाऱ्या प्रश्नांमुळे आपली छाप सोडण्यास असमर्थ ठरला आहे. सिध्दार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे या दोनही प्रमुख कलाकारांनी वरूण आणि कावेरीच्या भूमिकेत चांगले रंग भरलेत.
Release Date: June 28,2019Language: मराठी
Cast: सिध्दार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे,राजन भिसे,सविता प्रभुणे,अविनाश नारकर,राधिका विद्यासागर,दीप्ती लेले,ऋषीकेष जोशी
Producer: दीपा त्रासि, सुरेश म्हात्रे Director: समीर हेमंत जोशी
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स

अजय परचुरे 

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जोडप्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात अनेकदा व्दिधा परिस्थिती निर्माण होते. अश्या परिस्थितीत अनेकदा काही कठोर निर्णयही घ्यावे लागतात. या निर्णयाचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावरही होण्याची शक्यताही जास्त असते. मात्र तरीही केवळ निर्माण झालेल्या परिस्थितीने हे निर्णय घेऊन ही जोडपी पुढे जातात. अश्याच एका जोडप्याची कथा असणारा मिस यू मिस्टर हा सिनेमा विषय जरी वेगळा असला तरी मांडणी आणि सादरीकरणामुळे ,आणि प्रसंगानुरूप येणाऱ्या प्रश्नांमुळे आपली छाप सोडण्यास असमर्थ ठरला आहे. वैवाहीक नात्यांतील गुंतागुंत,एकमेकांपासून वेगळं होतानाची ओढाताण दाखवण्याच्या नादात दिग्दर्शकाची सिनेमावरची पकड मात्र सैल झाली आहे. 

सिनेमाची कथा थोडी वेगळी आहे. कावेरी (मृण्मयी देशपांडे) आणि तिचा नवरा वरूण (सिध्दार्थ चांदेकर) नव्याने लग्न झालेल्या जोडप्याच्या आयुष्यात  आर्थिक परिस्थिती अशी निर्माण होते की, वरुणला लंडनला नोकरीसाठी जावे लागते. या जोडप्याकडे मग १८ महिने वेगळे राहण्याशिवाय पर्याय उरत नाही. एकमेकांपासून वेगळे राहिल्याने या नवविवाहित जोडप्याच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होतो. सहा महिने संपल्यावर वरूण परत येतो, पण  तोपर्यंत त्यांच्यातील संबंधांमध्ये तणाव आलेला असतो. वरूण जेव्हा सांगतो की त्याला आणखी सहा महिन्यासाठी लंडनला जावे लागणार आहे, तेव्हा हा तणाव आणखी वाढतो. कावेरी घर सोडून जाते. वरुणची तारेवरची कसरत सुरु होते. व्यावसायिक प्रगती कि संसार, या दुहेरी पेचात तो अडकतो. मग व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य यांमधील द्विधा मन:स्थितीतून वरूण मार्ग काढू शकेल का? कावेरी आपला संसार वाचविण्यासाठी त्याच्याबरोबर लंडनला जाईल का?दोघांमध्ये अंतरामुळे आलेल्या दुराव्यावर त्यांच्यातील प्रेम मात करू शकेल का? ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सिनेमाच्या शेवटी मिळतील. (मात्र तोपर्यंत सिनेमा पुढे सरकत असताना तुम्हांला अजून प्रश्न पडायला लागतील तो भाग वेगळा).बसस्टॉप,मामाच्या गावाला जाऊया ,मंगलाष्टक वन्स मोअर या सिनेमाचा दिग्दर्शक समीर जोशीने हा संपूर्ण चित्रपट लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिपवर केंद्रीत केलेला आहे. जे नवरा बायको एकमेकांपासून कामानिमित्ताने लांब राहतात त्याच्यासाठी आणि जे नवविवाहित जोडपं आहे अशा सर्वांसाठी हा सिनेमा आहे. कथा वेगळी आहे . यातील कावेरी आणि वरूण ही दोन पात्रांची रचनाही मुळात चांगली झाली आहे. मात्र नुसती कथा वेगळी असली ,पात्रांची रचना बरी असली तरी सिनेमाचं सादरीकरण , आपल्याच कथेत निर्माण होणारे प्रश्न अनुत्तरीच राहतात.  लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिपनंतर एकत्र आल्यावर जी भांडणं होतात, जो दुरावा होतो त्या दुराव्याचं निरसन होताना सिनेमात घडणाऱ्या घटना अनाकलनीय आहेत. ज्या गोष्टीसाठी वरूण लंडनला पैसा कमावण्यासाठी जातो . त्याचा खरंच वापर होतो का ? मग जर पैसा कमावला आहे तर  ऑफिस परत मिळवण्यासाठी वरूण दुसरा मार्ग का निवडतो हे अतिशय अनाकलनीय प्रश्न दिग्दर्शक डोक्यात असूनही सोडवू शकलेला नाही असंच सिनेमा पाहताना जाणवतं.

सिध्दार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे या दोनही प्रमुख कलाकारांनी वरूण आणि कावेरीच्या भूमिकेत चांगले रंग भरलेत. सिनेमाचं पुढे जाणं किंवा सादरणीकरणात कमी पडणं ही सर्वस्वी दिग्दर्शकाची चूक असली तरी या दोन कलाकारांनी आपल्या अभिनयाने सिनेमातील रंगत थोडीफार का होईना कायम ठेवली आहे. वरूणच्या आई ,बाबांच्या भूमिकेत राजन भिसे आणि सविता प्रभूणे आणि कावेरीच्या आई बाबांच्या भूमिकेत असलेल्या अविनाश नारकर आणि राधिका विद्यासागर यांची उत्तम साथ या दोघांना मिळाली आहे. मात्र सविता प्रभूणे यांच्या आईच्या भूमिकेत आता तोचतोचपणा येऊ लागला आहे. सिनेमातील त्यांच्या काही जागा जरी थोडंफार मनोरंजन करत असल्या तरी त्यांच्या आधीच्या भूमिकांमध्ये तोच मसाला होता त्यामुळे तेच परत पहावं असा प्रकार आता वाटतो आहे. दिप्ती लेलेने कावेरीच्या बहिणीच्या भूमिकेत चांगली कामगिरी केली आहे. मात्र पाहुण्या भूमिकेत असलेल्या ऋषिकेश जोशीची भूमिका संपूर्णपणे फसली आहे. मुळात ही भूमिका आण्यामागचा उद्देशच दिग्दर्शक स्पष्ट करू शकलेला नाही. सिनेमातील गाणी वैभव जोशीने लिहीली असून संगीत आलाप देसाई यांनी दिलं आहे. सिनेमातील गाणी मात्र अतिशय सुरेल झाली आहेत. मात्र सादरीकरणातील अभाव आणि कथानकातूनच निर्माण होणाºया प्रश्नांमुळे हा सिनेमा अपेक्षा उंचावत नाही 
 

 

 

Web Title: Miss u Mister Marathi Film Review: Miss You Mister lost in the presentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.