Madhuri Marathi Movie Review : आई-मुलीचे नाते उलगडणारा चित्रपट | Madhuri Marathi Movie Review : आई-मुलीचे नाते उलगडणारा चित्रपट
Madhuri Marathi Movie Review : आई-मुलीचे नाते उलगडणारा चित्रपट
Release Date: November 30,2018Language: मराठी
Cast: सोनाली कुलकर्णी, संहिता जोशी, शरद केळकर, अक्षय केळकर, विराजस कुलकर्णी
Producer: मोहसिन अख्तरDirector: स्वप्ना वाघमारे जोशी
Duration: २ तास १ मिनिटंGenre:

लोकमत रेटिंग्स

ठळक मुद्देहताश, निराश झालेली आई आणि स्मृतीभ्रंश झालेली स्त्री अशा दोन्ही भूमिका सोनालीने खूपच चांगल्याप्रकारे साकारल्या आहेत. पण संहिताच्या अभिनयात तितकीशी सहजता जाणवत नाही.माधुरीची स्मृती का गेली, माधुरीचा भूतकाळ काय आहे असे अनेक प्रश्न आपल्याला चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच पडतात. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर पकड घेण्यात यशस्वी ठरतो. पण ही उत्तरे मिळाल्यानंतर आपली निराशा होते.

नात्यांमध्ये निर्माण होत असलेला दुरावा, जनरेशन गॅप, आई-मुलीचे नाते यांवर आजवर अनेक चित्रपट बनवण्यात आलेले आहेत. माधुरी हा चित्रपट त्याच पठडीतील चित्रपट असला तरी एका वेगळ्या अंदाजात हा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे.

माधुरी प्रधान (सोनाली कुलकर्णी) ही कॉलेजमध्ये प्रोफेसर असते. तिच्या काव्या या मुलीसोबत (संहिता जोशी) ती पाचगणीमध्ये राहात असते. आई आणि मुलगी यांच्यातील संवाद दिवसेंदिवस कमी होत असतो. काही ना काही कारणांनी त्यांच्यात सतत खटके उडत असतात. या सगळ्याला कंटाळून आपण आता हॉस्टेलमध्ये राहायला जायचे असे काव्या ठरवते. पण माधुरीचे ब्रेन हॅमरेज होते. त्यामुळे तिच्यावर एक शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे ती आपल्या आयुष्यातील २० वर्षं पूर्णपणे विसरून जाते. या सगळ्या घटनेनंतर माधुरी आणि काव्या या दोघांच्या नात्यात कशाप्रकारे चढ-उतार येतात हे माधुरी या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच माधुरी प्रधानची स्मृती गेली असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पहिल्या दृश्यापासून हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. माधुरीची स्मृती का गेली, तिच्या मुलीमध्ये आणि तिच्यात कोणत्या गोष्टीवरून वाद होत आहेत, माधुरीचा भूतकाळ काय आहे असे अनेक प्रश्न आपल्याला चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच पडतात. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर पकड घेण्यात यशस्वी ठरतो. पण ही उत्तरे मिळाल्यानंतर आपली निराशा होते आणि काही गोष्टी उगाचच कथेत टाकल्यासारखे जाणवते. आईची स्मृती गेल्यानंतरही तिचा तिरस्कार करणाऱ्या, तिला ओझे मानणाऱ्या काव्याचे काहीच क्षणात मतपरिवर्तन होते हे पटत नाही. तसेच आपण आयुष्यातील २० वर्षं विसरले आहोत असे म्हणणारी माधुरी काही दृश्यांमध्ये मुलीशी जुन्या गोष्टींवर इतक्या छान गप्पा मारते की खरंच हिला आठवत नाहीये ना... हा प्रश्न पडतो. चित्रपटात खूपच मेलोड्रामा, नाट्य उगाचच टाकले आहे. बँकराऊंड स्कोरचा तर काही वेळाने कंटाळा यायला लागतो. 

चित्रपटाचा विषय माधुरी आणि तिची मुलगी यांच्याभोवतीच फिरत असल्याने जास्तीत जास्त दृश्य ही सोनाली कुलकर्णी आणि संहिता जोशी यांच्यावरच चित्रीत करण्यात आलेली आहे. हताश, निराश झालेली आई आणि स्मृतीभ्रंश झालेली स्त्री अशा दोन्ही भूमिका सोनालीने खूपच चांगल्याप्रकारे साकारल्या आहेत. पण संहिताच्या अभिनयात तितकीशी सहजता जाणवत नाही. शरद केळकरने डॉ. तुषार ही भूमिका खूपच चांगल्याप्रकारे साकारली आहे. त्याचा वावर चांगलाच भावतो. तसेच अक्षय केळकरने देखील चांगले काम केले आहे. चित्रपटाचे काही संवाद देखील मस्त जमून आले आहेत. पण या चित्रपटातील कोणतीच गाणी ओठावर रुळत नाहीत. 


Web Title: Madhuri Marathi Movie Review : आई-मुलीचे नाते उलगडणारा चित्रपट
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.