गंभीर कॅनव्हासवरचा प्रसन्न गोतावळा…!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2016 04:00 PM2016-11-02T16:00:54+5:302016-11-06T18:09:18+5:30

‘व्हेंटिलेटर’ची कथा आहे कामेरकर कुटुंबाची. नात्यांचा एक अनोखा प्रवास सिनेमात मांडण्यात आल्या आहे.

गंभीर कॅनव्हासवरचा प्रसन्न गोतावळा…! | गंभीर कॅनव्हासवरचा प्रसन्न गोतावळा…!

गंभीर कॅनव्हासवरचा प्रसन्न गोतावळा…!

googlenewsNext
Release Date: November 04,2016Language: मराठी
Cast: आशुतोष गोवारीकर,जितेंद्र जोशी, अभिनेत्री सुलभा आर्या, उषा नाडकर्णी, सुकन्या मोने
Producer: डॉ. मधु चोप्रा (पर्पल पेबल पिक्चर्स )Director: राजेश मापुसकर
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
राज चिंचणकर


रुग्णालय म्हणजे गांभीर्य, ताण आणि धावपळ ! रुग्णालयाच्या वास्तूत हे चित्र तसे नित्याने दिसणारे; परंतु याच रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची किमया दिसते, ती 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात आणि या किमयेच्या मागे आहे, ती या चित्रपटाची पटकथा, तिची मांडणी आणि व्यक्तीरेखाटन !  तुमच्या-आमच्या मनाच्या तळाशी दडलेल्या भावनांचे प्रतिबिंब या चित्रपटात प्रकषार्ने दिसते. त्यामुळे हा चित्रपट अंतर्मनाशी संवाद साधत राहतो. संवेदना आणि विनोद यांची योग्य सांगड घालत गंभीर कॅनव्हासवरचा हा गोतावळा या चित्रपटात प्रसन्नतेने टिपला गेला आहे. 

कौटुंबिक पातळीवर सर्वसाधारणपणे, मुलगा हा आईच्या जास्त जवळ असतो आणि मुलगी वडिलांच्या मायेत अधिक असते; असे म्हटले जाते. आई आणि मुलाचे नाते उलगडणारे काही चित्रपट याआधी येऊन गेले आहेत; परंतु हे वळण बदलून 'व्हेंटिलेटर' हा चित्रपट वडील आणि मुलाचे नाते अधोरेखित करतो. साहजिकच, गोष्टीचा पाया नाविन्यपूर्ण ठरल्याने त्यावर बांधलेले इमलेही लक्षवेधी ठरतात. विशेष म्हणजे, एकंदर गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर नात्यांचे बंध उलगडून दाखवताना चित्रपटाने उगाचच सुतकी अविर्भाव वगैरे आणलेला नाही. उलट गोष्टीला हलकीफुलकी ट्रीटमेंट देत नात्यांचा हा पसारा सहजतेने मांडण्याचे काम या चित्रपटाने केले आहे. 

चित्रपटाची गोष्ट तशी छोटीशी आहे; परंतु तिचा आवाका विस्तृत आहे. गणपतींचे दिवस तोंडावर आले असतानाच कामेरकर कुटुंबातल्या गजूकाकांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येते. वास्तविक एखाद्या कुटुंबाच्या दृष्टीने हा गंभीर प्रसंग; परंतु अवाढव्य पसरलेल्या कामेरकर कुटुंबातल्या इरसाल व्यक्तींमुळे हा ताण हलका होतो. मुंबईच नव्हे; तर कोकण आणि कोल्हापूरचे कामेरकर परिवाराचे सदस्य रुग्णालयात गर्दी करतात. पण यातल्या काहीजणांचा त्यात स्वार्थही आहे. राजकीय गोतावळ्यात रमलेला गजूकाकांचा मुलगा प्रसन्न आणि बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक असलेला गजूकाकांचा पुतण्या राजा यांच्यावर प्रामुख्याने हा अवघड प्रसंग निभावून नेण्याची मदार आहे. गणेशोत्सव पार पडेपर्यंत तरी गजूकाकांना व्हेंटिलेटरवर ठेवावे अशी काहीजणांची इच्छा आहे; तर काहीजण या प्रसंगाचे भान पार विसरलेले आहेत. असे सगळे मुद्दे एकत्र आल्यावर रुग्णालयातच कौटुंबिक वाद उफाळून येतात. यातून पुढे काय निष्पन्न होते, ते सांगत ही गोष्ट निश्चित अशा वळणावर येऊन पोहोचते.  

एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्या पेलल्यावर अनेकदा जी तारांबळ उडालेली दिसून येते, त्याला छेद देत राजेश मापुसकर यांनी ही गोष्ट मांडली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी या चित्रपटाची चौफेर जबाबदारी त्यांनी चांगली पेलली आहे. परिणामी, एकजिनसीकरणाचा अनुभव देण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी डोकावून गेलेल्या प्रश्नांना वाचा फोडत आणि त्यांचे सादरीकरण करत त्यांनी मजल मारली आहे. चित्रपटात बऱ्याच मोठ्या स्टारकास्टला हाताळताना त्यांनी दाखवलेली प्रगल्भता ठोसपणे समोर येते. तीक्ष्ण नजरेतून, व्यक्तिमत्वातले बारकावे हेरत त्यांनी यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेकडे पुरवलेले लक्ष ठसठशीत जाणवते. मात्र, यातल्या एखाद-दोन प्रसंगांची हाताळणी सैल वाटते; तर एका प्रसंगात तोचतोचपणा डोकावतो. त्यांना थोडी कात्री लागणे आवश्यक होते. संगीतकार रोहन-रोहन यांनी चित्रपटात दिलेली 'या रे या' आणि 'बाबा' ही गाणी जमून आली आहेत. सविता सिंग यांचा कॅमेरा चित्रपटात अचूक बोलला आहे; त्यामुळे बहुतांश वेळ एकाच लोकेशनवर हा चित्रपट घडत असूनही त्याचे देखणेपण उणावलेले नाही.  

 बऱ्याच काळानंतर अभिनय क्षेत्रात उडी घेणारे आशुतोष गोवारीकर यांनी राजाच्या भूमिकेत मस्त बॅटिंग केली आहे. चित्रपट दिग्दर्शकाची व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी 'रियल लाईफ'चे चांदणे पसरवत त्यांचे 'कमबॅक' साजरे केले आहे. जितेंद्र जोशी याने राजकारणात अडकलेल्या आणि त्याचवेळी भावनांची आंदोलने झेलणाऱ्या प्रसन्नची व्यक्तिरेखा ठोस रंगवली आहे. या दोघांसह चित्रपटाच्या गोष्टीत उत्तम रंग भरणारे निखिल रत्नपारखी, सुकन्या मोने, सुलभा आर्य, उषा नाडकर्णी, सतीश आळेकर, स्वाती चिटणीस, विजू खोटे, नम्रता आवटे, राहुल पेठे या आणि इतर अनेक कलाकारांची समरसता चित्रपटाला उंची गाठून देते. पाहुणी कलाकार म्हणून प्रियांका चोप्राचे दर्शनही सुखावह आहे. डॉक्टरच्या छोट्याश्या भूमिकेत बोमन इराणी भाव खाऊन जातात. एकूणच हसत, हसवत, मधूनच पापण्यांच्या कडा ओलावत मनाला थेट भिडणारा हा चित्रपट आहे आणि त्यामुळे या 'व्हेंटिलेटर'शी आपोआपच नाते निर्माण होत जाते.    

Web Title: गंभीर कॅनव्हासवरचा प्रसन्न गोतावळा…!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.