Stree Movie Review: पैसा वसूल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 01:07 PM2018-08-31T13:07:54+5:302023-08-08T19:28:38+5:30

दिनेश विजान निर्मित आणि  राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी सारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘स्त्री’हा चित्रपट कसा आहे, ते जाणून घेऊ यात.

Stree Movie Review | Stree Movie Review: पैसा वसूल!!

Stree Movie Review: पैसा वसूल!!

Release Date: August 31,2018Language: हिंदी
Cast: राजकुमार राव, श्रद्धा कपूर श्रद्धा कपूर, अपारशक्ति खुराणा, पंकज त्रिपाठी, अभिषेक बनर्जी
Producer: दिनेश विजान, कृष्णा डी के Director:  अमर कौशिक
Duration: 2 तास ८ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

-श्वेता पांडेय

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा हॉरर कॉमेडीचा ट्रेंड आलाय.  रोहित शेट्टीच्य ‘गोलमाल’ या सुपरडुपरहिट सीरिजच्या चौथ्या चित्रपटाने याची सुरूवात झाली. आज असाच एक हॉरर-कॉमेडी प्रकारातील अमर कौशिक दिग्दर्शित चित्रपट   रिलीज झाला. या चित्रपटाचे नाव आहे, ‘स्त्री’. या चित्रपटाद्वारे अमर कौशिक दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पर्दापण करत आहेत. राज आणि डीकेने या चित्रपटाची कथा लिहिली आहे. चला तर मग, दिनेश विजान निर्मित आणि  राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी सारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट कसा आहे, ते जाणून घेऊ यात.

चित्रपटाची कथा सुरू होते ती मध्यप्रदेशातील चंदेरी गावातून. या गावाच्या प्रत्येक भिंतीवर ‘ओ स्त्री कल आना’ असे लाल शाईने लिहिलेले आहे. चंदेरी गावात स्त्री नावाच्या एका चेटकिणीची इतकी दहशत असते की, तिच्यापासून वाचण्यासाठी गावातील प्रत्येक जण आपल्या घराच्या भींतीवर हा संदेश लिहितो. याच गावात   विकी (राजकुमार राव) नामक एक तरूण मित्र बिट्टू (अपारशक्ती खुराणा) आणि जना (अभिषेक बॅनर्जी) या मित्रांसोबत  राहत असतो. आजूबाजूच्या गावात लेडीज टेलर म्हणून तो प्रसिद्ध असतो. गावातले सगळे लोक चेटकिणीला घाबरतात. पण विकीला मात्र या गोष्टीवर जराही विश्वास नसतो. याचदरम्यान एक अनामिक सुंदर मुलीसोबत (श्रद्धा कपूर) त्याची मैत्री होते आणि दुसरीकडे विकी आणि बिट्टूचा मित्र जना याला स्त्री नावाची चेटकीण आपले लक्ष्य बनवते. इथून पुढे चित्रपटाची कथा एक अनपेक्षित वळण घेते. यानंतर विकी व बिट्टू गावात ‘स्त्री’वर संशोधन करत असलेल्या रूद्रच्या (पंकज त्रिपाठी) मदतीने जनाचा शोध घेऊ लागतात. त्यांचा हा शोध कुठल्या वळणावर जातो? स्त्री नावाची चेटकीण खरोखरचं अस्तित्वात आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहांचीच वाट धरावी लागेल.
चित्रपटाची कथा आणि संवाद दोन्हीही मस्त जमून आले आहेत. चित्रपटाची एकूणच कथा पडद्यावर इतकी सहज आणि सुंदर पद्धतीने मांडलीय की, एक क्षणही तुम्ही हा चित्रपट सोडू शकणार नाहीत. चित्रपटातील संवादही जबरदस्त आहेत. आपल्या पहिल्याचं चित्रपटात अमर कौशिक यांनी कमालीचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट पाहतांना एका क्षणाला तुम्ही घाबरून ओरडता तर दुस-याच क्षणाला खो-खो हसत सुटता. यातील अनेक प्रसंग  भीती आणि हास्य असे दोन्ही अनुभव एकाचवेळी देतात. शेवटपर्यंत हा चित्रपट तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो. अभिनयाबद्दल बोलायचे तर राजकुमार रावने पुन्हा एकदा दमदार अभिनय केला आहे. आपल्या ‘युनिक ट्रान्सफॉर्मेशन’साठी ओळखल्या जाणा-या राजकुमारने या चित्रपटातही स्वत:ला सिद्ध केले आहे. पंकज त्रिपाठींचा अभिनयही राजकुमारच्या तोडीस तोड आहे. अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती यांनीही आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकांना पूरेपूर न्याय दिलाय. श्रद्धा कपूरने नेहमीप्रमाणे ठीकठीक अभिनय केला आहे.

एडिटींगच्या बाबतीत कमालीची दक्षता दाखवल्याने चित्रपट उगाच रेंगाळत नाही. चित्रपटाची गाणीही कथेला साजेशी आहेत. चित्रपटाचे पार्श्वसंगीत तुम्हाला कापरं भरवतं. एकंदर काय तर सगळ्यांचे सुंदर मिश्रण असलेला एक चांगला आणि पैसा वसूल हॉरर कॉमेडी चित्रपट तुमची प्रतीक्षा करतोय.
 

Web Title: Stree Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.