उल्हासनदी प्रदूषित होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:31 AM2019-06-13T01:31:21+5:302019-06-13T01:31:57+5:30

लब्धी गार्डन प्रकल्पाबाबत तक्रार : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास पत्र

The possibility of Ulhasanadani pollution in raigad district | उल्हासनदी प्रदूषित होण्याची शक्यता

उल्हासनदी प्रदूषित होण्याची शक्यता

Next

कांता हाबळे

नेरळ : कर्जत येथून वाहत नेरळकडे येत असताना दहिवली गावाजवळ उल्हासनदीच्या तीरावर असलेले लब्धी गार्डन प्रदूषित पाणी सोडत असल्याची तक्रार उल्हासनदी बचाव मोहिमेचे कार्यकर्ते केशव बबन तरे यांनी लेखी पत्र देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग रायगड, तहसीलदार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, त्या ठिकाणी जमीन विकसित करीत असलेल्या विकासकाने आपल्या सोसायटीमधील एक लीटर पाणीदेखील उल्हासनदीमध्ये जाणार नाही याची काळजी घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उल्हासनदी प्रदूषणाचा विषय सध्यातरी सुटला आहे.

लब्धी गार्डन्स हा रहिवासी प्रकल्प नेरळपासून चार कि.मी. अंतरावर उल्हासनदीच्या किनारी दहिवली गावाजवळ साधारणत: दहा एकरमध्ये बांधण्यात आला असून, सद्यस्थितीत पाच फेजमध्ये ५०० कुटुंब या ठिकाणी स्थायिक होणार आहेत. ५०० कुटुंबीय म्हणजे अंदाजे २५००-३००० लोकसंख्या नव्याने राहायला येऊ शकते. हा प्रकल्प बारमाही वाहती असलेल्या उल्हासनदीच्या पात्रापासून हाकेच्या अंतरावर असून या रहिवासी संकुलातील सांडपाण्याचा प्रश्न येथील स्थानिक रहिवासी म्हणून ही गंभीर बाब आम्हाला वाटत आहे. कारण, हे सांडपाणी उल्हासनदीत सोडण्याचा प्रयत्न लब्धी गार्डन या विकासकाकडून सुरू आहे. दहिवली गावापासून ते नदीपर्यंतच्या सर्व जागेवर लब्धी गार्डन या विकासकाद्वारे व्यावसायिक दृष्टिकोनातून गृहप्रकल्प उभा केला जात आहे, असे के शव तरे यांनी सांगितले.
पूर्वी या संकुलालगत एक नैसर्गिक ओढा होता जो शेती आणि गावातील गोळा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा नदीपात्रात वाहून नेत होता; परंतु आता या ओढ्याच्या अर्ध्या भागात संरक्षण भिंत बांधली असून तो अरुंद करण्यात आला आहे, तसेच संकुलातील सांडपाण्याला वाट करून देण्यासाठी दोन मोठ्या भूमिगत पाइपलाइन टाकल्या असून, संकुलातील सांडपाणी या ओढ्यात सोडले जाणार असून पुढे ते पाणी ओढ्या मार्गाने नदीत मिसळणार आहे. पावसाच्या पाण्याच्या आडून हे सांडपाणी ग्रामीण भागातील जनतेच्या पाण्यात विरजणच असणार आहे. ही बाब अतिशय गंभीर असून कोणत्याही नियमांचे पालन न करता हा प्रकार सुरू असून, हा प्रकार निदर्शनास आणण्याचा प्रयत्न तक्रारकर्ते केशव तरे यांनी केला आहे. आजघडीला या नदीमुळे जवळपास ४८ गावांना पिण्याच्या पाण्याचे एकमेव साधन असताना जर हे सांडपाणी नदीमध्ये सोडले तर बारमाही वाहती नदी दूषित होऊ शकते. असे असताना आज कर्जत-नेरळ परिसरात नदीकिनारी सुरू असलेले रहिवासी संकुल नदीचे आकर्षण दाखवून ग्राहकांना आकर्षित करत असून कालांतराने या नैसर्गिक स्रोताचीही विदारक अवस्था होण्यास विलंब लागणार नाही.
लब्धी गार्डन या विकासकाने संकुलातील सांडपाणी पाइपलाइनद्वारे ओढ्यात सोडून ते पुढे नदीला मिळणार अशी व्यवस्था करत, कायदा हातात घेऊन नैसर्गिक स्रोत दूषित करण्याचा डाव असून तो वेळीच थांबला पाहिजे, अशी मागणी केली आहे. कायद्यानुसार नदीपात्रालगत जे रहिवासी अथवा बांधकाम होत आहे त्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था ही अंतर्गत असावी, हा नियम आहे.

आम्ही आमच्या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तयार केला आहे. आमच्या सोसायटीमधील एक लीटर पाणीदेखील आम्ही बाहेर सोडत नसून पाच लाख लीटर क्षमता असलेला हा प्रकल्प आहे. दुसरीकडे आमच्या येथे केवळ १०० कुटुंब राहत आहेत. त्याच वेळी सर्व ५०० कुटुंब राहायला आली तरी एक थेंब पाणी बाहेर सोडले जाणार नाही. दुसरीकडे ज्या उल्हासनदीमध्ये पाणी सोडले असा गैरसमज केला जात असून, आम्हीदेखील त्याच उल्हासनदीचे पाणी पितो मग तेथेच कसे काय सांडपाणी सोडणार? सध्या आम्ही प्रक्रिया केलेले पाणी बगिचा आणि बांधकामासाठी वापरत आहोत.
- विकास जैन,
संचालक, लब्धी गार्डन

आमचे एकमेव पाण्याचे साधन असलेली नैसर्गिक संपदा म्हणून उल्हासनदी असताना ती दूषित करण्याचा जो डाव आहे तो विकासकाने वेळीच थांबवावा, तसेच प्रत्येक नागरिकाने, तरुणांनी आपल्या आजूबाजूला जागरूकतेने लक्ष ठेवून असे प्रकार निदर्शनास आणले पाहिजेत. आम्ही या संदर्भात पत्र पाठवून संबंधित विभागास तक्रार केली आहे, अपेक्षा आहे की यावर वेळीच योग्य ती कारवाई करून हा प्रकार थांबविला पाहिजे.
- केशव तरे, माजी अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती
 

Web Title: The possibility of Ulhasanadani pollution in raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.