निवडणूक खासदारकीची; पण प्रचार आमदारकीचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 03:27 AM2019-04-01T03:27:14+5:302019-04-01T03:27:38+5:30

शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार चालू झाला आहे. निवडणूक खासदारकीची असली तरी आगामी विधानसभा निवडणूक ...

Election MPs; But the MLAs of the public | निवडणूक खासदारकीची; पण प्रचार आमदारकीचा

निवडणूक खासदारकीची; पण प्रचार आमदारकीचा

Next

शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार चालू झाला आहे. निवडणूक खासदारकीची असली तरी आगामी विधानसभा निवडणूक डोळ््यासमोर ठेवून उन्हातान्हाची पर्वा न करता इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळवून दिले नाही तर अजित पवार विधानसभेचे तिकीट कापतील, अशी धास्ती या इच्छुकांना असल्याने प्रचार करण्याची स्पर्धाच विधानसभेच्या इच्छुकांमध्ये लागली आहे.

२००८ मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. यानंतरच्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील निवडून आले. सन २०१४ च्या निवडणुकीतही आढळराव-पाटील पुन्हा जिंकले. त्यांच्या विजयाची आणि राष्ट्रवादीच्या पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी राष्ट्रवादीने यावेळी अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघांतल्या स्थानिक नेत्यांनी एकदिलाने काम करावे, अशी सूचना अजित पवार यांनी दिली आहे. यामुळे शिरूर-हवेली मतदारसंघातले माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार प्रचाराला लागले आहेत. याच मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही हिरीरीने प्रचारात भाग घेतला आहे. अ‍ॅड. पवार यांच्याऐवजी आमदारकीचे तिकीट आपल्यालाच मिळाले पाहिजे, असा कंद यांचा प्रयत्न आहे. ही खासदारकीची निवडणूक असतानाही काही नेते आमदारकीसाठी प्रचार करत असताना दिसत आहेत.

च्कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरूर तालुक्यातील गावांना भेटी देण्यात आल्या. त्यावेळी कंद अ‍ॅड. पवार यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरल्याचे दिसले. अ‍ॅड. पवार यांनी २००९ ते २०१४ शिरूर हवेलीचे आमदार होते. मात्र कोल्हेंच्या प्रचाराच्यानिमित्ताने कंद हेही मतदारसंघात घुसू लागले आहेत. संधी मिळेल तेव्हा शक्तिप्रदर्शन करण्याची स्पर्धा पवार आणि कंद यांच्यात लागली आहे. अजित पवारांना खूश करण्यासाठी आणि विधानसभेच्या उमेदवारीची दावेदारी निश्चित करण्यासाठी पवार आणि कंद पळताना दिसत आहेत. यातूनच दोघांच्याही चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत आहे. पवार आणि कंद यांच्या समर्थकांंमध्येही प्रचाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची स्पर्धा
लागली आहे.

अमोल कोल्हे छान अभिनय करतात म्हणून!
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांना राष्टÑवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांनी आव्हान दिले आहे. अमोल कोल्हे यांची ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका सध्या सुरू आहे. त्यामुळे प्रचारातून वेळ काढून त्यांना शूटिंगसाठी जावे लागते. याबाबत एका सभेत बोलताना आढळराव म्हणाले, की अमोल कोल्हे छान अभिनय करतात. सगळ्यांना त्यांचा अभिनय आवडतो मलासुद्धा आवडतो. सगळ््यांना त्यांचा अभिनय पाहता यावा, म्हणून त्यांना घरी बसवा. म्हणजे ते छान अभिनय आपल्यासाठी करतील!

समाज आमच्याही मागे आहे
प्रवीण गायकवाड यांनी पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठीचे प्रयत्न सोडलेले नाहीत. पुण्यातल्याच नव्हे तर राज्यातले मराठे पाठीशी असल्याने त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असा प्रचार त्यांनी चालवला आहे. काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांची मते आपापल्या जातीचे पाठबळ असणारे अनेक नेते पुण्यात आहेत. ‘‘मराठ्यांचे प्रतिनिधीत्व एकटे गायकवाड करीत नाहीत. इतर जातींचे प्रतिनिधीत्व करणारेही सक्षम उमेदवार पुण्यातल्या काँग्रेसकडे आहेत,’’ असे आकड्यानिशी सांगण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातली उमेदवारी जाहीर करताना काँग्रेस श्रेष्ठींवर याचा किती प्रभाव पडतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

...तर अशोक चव्हाणांनाही बदला
लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेसने महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नेमले. पण खर्गे स्वत:देखील कर्नाटकातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे खर्गे प्रभारीपदाला न्याय देऊ शकणार नाहीत, असे गृहीत धरून काँग्रेसने महाराष्ट्राचे प्रभारीपद आता मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे सुपूर्त केले आहे. हाच न्याय ‘हायकमांड’ने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही लावावा, अशी मागणी काँग्रेस निष्ठावंत करू लागले आहेत. चव्हाणदेखील नांदेडमधून निवडणूक लढवत आहेत. स्वत:चा प्रचार सोडून चव्हाणांना महाराष्ट्र पिंजून काढता येणार नाही; त्यामुळे चव्हाण यांच्याऐवजी सक्षम नेतृत्वाकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी, असे काँग्रेसजनांचे मत आहे. अर्थात हे मत उघडपणे ‘हायकमांड’ला सांगण्याचे धाडस काँग्रेसजनांमध्ये नाही. त्यामुळे काँग्रेस भवनाच्या आवारात तेवढी कुजबुज चालू आहे.
 

Web Title: Election MPs; But the MLAs of the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.