राऊत अन् राणेंची लढाई, कोकणात कोण मारेल बाजी ?

By वैभव देसाई | Published: April 18, 2019 08:01 AM2019-04-18T08:01:57+5:302019-04-18T08:07:53+5:30

यंदाची परिस्थिती विनायक राऊतांसाठी अनुकूल नाही...

ratnagiri-sindhudurg fight between nilesh rane and vinayak raut | राऊत अन् राणेंची लढाई, कोकणात कोण मारेल बाजी ?

राऊत अन् राणेंची लढाई, कोकणात कोण मारेल बाजी ?

Next

- वैभव देसाई
सध्या सगळीकडेच राजकीय प्रचाराचा धुरळा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोकणातही सध्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. शिवसेना-भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर त्यांच्या समोर आव्हान आहे ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे माजी खासदार निलेश राणे आणि काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे. गेल्या वेळी मोदी लाट असल्यानं विनायक राऊत सहजगत्या खासदार झाले. परंतु यंदाची परिस्थिती त्यांच्यासाठी फारशी अनुकूल नाही.

कोकणचे वजनदार नेते नारायण राणेंनी त्यांचे पुत्र निलेश राणेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून या निवडणुकीला चांगलीच रंगत आणली आहे. नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये असून, त्यांनी निलेश राणे निवडून आल्यास मोदींना पाठिंबा देणार असल्याची घोषणाच करून टाकली आहे. त्यामुळे विनायक राऊत यांची पुरती अडचण झाली आहे. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांचीही तारांबळ उडाली आहे. नक्की प्रचार करायचा कोणाचा हा प्रश्न भाजपाच्या कार्यकर्त्यांना सतावतो आहे. विनायक राऊत यांच्याबद्दल कोकणातल्या जनतेत कमालीची नाराजी आहे. त्यातच भाजपाच्या कार्यकर्त्यांना गेल्या पाच वर्षांपासून ते वारंवार दुर्लक्षित करत असल्यानं कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्याविषयी नाराजी आहे. सेना भाजपात युती झाली असली तरी कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालेले नाही. राज्यभरात असलेली ही स्थिती कोकणातही दिसून येत आहे. युतीतील हा बेबनाव महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गात दोन्ही पालकमंत्रिपदे आणि खासदार शिवसेनेचे आहेत. यापैकी कुणीही भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय दिलेला नाही. जिल्हा नियोजन बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्यांची कामे डावलणे, त्यांना संधी न देणे, त्यांच्या कामांना केराची टोपली दाखवणे असे प्रकार सातत्यानं घडले होते. त्यामुळे नाराज भाजप कार्यकर्त्यांनीही पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांचा जाहीर उद्धार करण्यास सुरुवात केली होती. सेनेने केलेल्या अन्यायाचे उट्टे काढण्याची नामी संधी आता भाजपाकडे चालून आली आहे. भाजपाचा कार्यकर्ता हा कट्टर मानला जातो. तो काँग्रेसला कधीही मतदान करीत नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार भाजपा कार्यकर्त्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच अनेक कार्यकर्ते राऊतांचा प्रचार करण्यास निरुत्साही आहेत. त्यामुळे सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या सुंदोपसुंदीमुळेच यंदा भाजपाचे कार्यकर्ते कोणाचा प्रचार करणार हाच प्रश्न त्यांना बुचकळ्यात टाकतोय.


नारायण राणेही संधी मिळेल तेव्हा भाजपा सरकारला लक्ष्य करत असल्यानं कोकणातील भाजपा नेत्यांनाही राणे फारसे पटत नाहीत. परंतु निलेश राणेंसह नारायण राणेंनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्यानं त्यांचा प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीचा नारा शिवसेनेने पाळला नाही. सातबारा कोरा केला नाही. गेल्या पाच वर्षात शेतकर्‍यांच्या शेतमालाला ते हमीभाव देऊ शकले नाहीत. कर्जमाफीसाठी खासदार राऊतांनी लोकसभेत आवाज उठविला नाही. शेतकर्‍यांच्या हिताचे प्रश्‍नही मांडले नाहीत, असा प्रचार राणे कंपनीकडून केला जातोय. तर खंबाटा प्रकरणावरून विनायक राऊत पुरते विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच सर्वाधिक कोकणी माणूस असलेल्या खंबाटा कामगारांच्या तोंडचा घास काढून घेतला. या कामगारांच्या हक्काच्या पैशांवर मातोश्री 2 उभे राहिले आहे, असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ता आणि नि:स्वार्थ कामगार संघटनेच्या अध्यक्षा अंजली दमानिया यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन केल्यानं राऊत पुरते गाळात सापडले आहेत.

खंबाटा एव्हिएशन 40 वर्षांहून अधिक काळ मुंबई विमानतळावर ग्राउंड हंडलिंगचे काम करणारी कंपनी होती. इथे 2700च्या आसपास कामगार काम करीत होते. 70% हून अधिक कामगार हे मराठी होते. बहुतांश कामगारांनी आपले नेतृत्व शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेकडे सोपवले होते. त्याचे अध्यक्ष विनायक राऊत होते.  खंबाटा यांनी वेळोवेळी कामगारांना भरघोस वाढ देण्याचे कबूल केले होते. पण भारतीय कामगार सेनेच्या विनायक राऊत यांनी ही रक्कम कामगारांना देण्याची गरज नाही, असा धोशा लावल्याचाही मुद्दाही आता उपस्थित केला जातोय. तसेच जाहिरातीत आयर्लंडचा रस्ता हा कोकणातला असल्याचं दाखवूनही विनायक राऊत विरोधकांच्या टीकेचे धनी झाले आहेत. तर निलेश राणेंनी पोलिसांना केलेल्या शिवीगाळीमुळेही त्यांचा नकारात्मक प्रचार केला जातोय. मी कोणत्याही प्रकारे शासकीय कामात अडथळा आणला नाही. केवळ माझ्या गाडीत डोकावणाऱ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला हटकल्याच्या रागातून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा एक विरोधी पक्षाकडून पूर्वनियोजित रचलेला कट आहे, असं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार तथा माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटलं आहे.


एकंदरीत विनायक राऊत असो किंवा निलेश राणे कोणत्या ना कोणत्या कारणानं ते दोघेही वादात सापडत आहेत. तसेच या निवडणुकीत विनायक राऊत यांचा निलेश राणेंच्या माध्यमातून थेट सामना नारायण राणेंशी असल्यानं ही निवडणूक चुरशीची झाली आहे. 2014च्या निवडणुकीत विनायक राऊतांनी निलेश राणेंचा जवळपास 150000 मताधिक्क्यानं पराभव केला होता. परंतु तेव्हा निलेश राणे विरुद्ध सर्वपक्षीय नेते अशी निवडणूक झाली होती. पण आता परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळे साहजिकच विनायक राऊत यांना वाटतो तेवढा विजय सोपा नाही. विनायक राऊत यांचं MAपर्यंत शिक्षण झालं आहे, तर निलेश राणेंनीही पीएचडी मिळवली आहे. दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित असल्यानं कोकणची जनता यंदा कोणाच्या पारड्यात मतं टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: ratnagiri-sindhudurg fight between nilesh rane and vinayak raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.