युतीचा निष्ठावंतांवर, तर स्वाभिमानचा नाराजांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:10 AM2019-04-19T05:10:52+5:302019-04-19T05:11:32+5:30

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निष्ठावंत विरुद्ध नाराज अशाच पद्धतीने रंगू लागली आहे.

On the loyalty of the alliance, and the feelings of self-esteem | युतीचा निष्ठावंतांवर, तर स्वाभिमानचा नाराजांवर भर

युतीचा निष्ठावंतांवर, तर स्वाभिमानचा नाराजांवर भर

Next

- मनोज मुळ्ये
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निष्ठावंत विरुद्ध नाराज अशाच पद्धतीने रंगू लागली आहे. विकासाच्या मुद्द्यांपेक्षा नाराजी आणि फोडाफोडी याचीच चर्चा अधिक जोमाने सुरू आहे. शिवसेना आणि भाजप यांचे मनोमिलन झाले असले तरी ते तळागाळापर्यंत झिरपलेले नाही आणि राष्ट्रवादीसोबत जुळवून घेत प्रचार करण्याची हातोटी अजून काँग्रेसला जमलेली नाही. त्यामुळे ही निवडणूक निष्ठांवत विरुद्ध नाराज अशाच वळणावर थांबली आहे.
शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मतदार हे प्रत्येक निवडणुकीत ठाम असल्याचे चित्र आजवर अनेकदा दिसले आहे. पण भाजपमध्ये शिवसेनेबद्दल असलेली नाराजी उघडपणे जाहीर झाली आहे. ही नाराजी मिटवून मनोमिलन करण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केले गेले आणि त्याचा बऱ्याच अंशी परिणाम दिसला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना उमेदवार राऊत यांच्या प्रचारात सहभागी झाले. मात्र हे मनोमिलन १00 टक्के नाही. पाच वर्षांत आपल्याला काहीच मिळाले नाही, हा सल भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात भाजपमधील नाराजी टिकून आहे.
जी स्थिती युतीमध्ये आहे, तीच स्थिती आघाडीमध्ये आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या आघाडीत एकवाक्यता नाही. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र प्रचार करताना दिसत नाहीत. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला केलेल्या मदतीची परतफेड आता लोकसभा निवडणुकीत होणार का? शरद पवार-नारायण राणे यांच्या मध्यंतरीच्या भेटीचा लाभ नीलेश राणे यांना होणार का? असे काही प्रश्न अनुत्तरित आहेत.
युतीमधील नाराजी आणि आघाडीतील बिघाडी यावर राणेंच्या महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाची मदार आहे. सिंधुदुर्गात स्वत:ची ताकद असलेल्या स्वाभिमानला रत्नागिरीत अधिक परिश्रम घ्यावे लागत आहेत.
या लढतीत काँग्रेस मात्र अजूनही आक्रमकपणे पुढे आलेली नाही. काँग्रेसच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात शांतताच आहे. आधीच पक्षाची झालेली असाहाय्य स्थिती आणि त्यात राष्ट्रवादीचा संभ्रम यामुळे मुख्य लढतीत काँग्रेस आपला सहभाग टिकवणार कसा, हा प्रश्नच आहे.
>गत निवडणुुकीत दीड लाखाच्या फरकाने विजय मिळाला असला तरी आम्ही गाफील नाही. जिल्हा परिषद गटनिहाय प्रचार आम्ही नेटाने सुरू ठेवला आहे. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत. हे निष्ठावंत कार्यकर्तेच युतीची प्रतिष्ठा कायम ठेवतील, याचा मला विश्वास आहे.
- विनायक राऊत, शिवसेना
पाच वर्षांत रत्नागिरी-सिंधुदुर्गात कोणतीही कामे झाली नाहीत. एकतर आराखड्यांइतके पैसेच आले नाहीत आणि आले ती रक्कमही खर्ची पडली नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा विकास ठप्प झाला आहे. सामान्य माणसाच्या हाताला काम देण्याचे ध्येय घेऊन मी रिंगणात उतरलो आहे.
- नीलेश राणे, स्वाभिमान
>कळीचे मुद्दे
भाजपची शिवसेनेबद्दलची नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभ्रमावस्था हा सर्वांत कळीचा मुद्दा
दोन जिल्ह्यांच्या विकासावर बोलण्याऐवजी शिवसेना-स्वाभिमानकडून वैयक्तिक आरोपांवर अधिक भर

Web Title: On the loyalty of the alliance, and the feelings of self-esteem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.