Raj Thackeray Eknath Shinde: राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी; सहकुटुंब घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 10:06 PM2022-09-06T22:06:24+5:302022-09-06T22:48:31+5:30

बाप्पाच्या दर्शनानंतर चहा आणि गप्पांचाही खुमासदार कार्यक्रम रंगला...

Raj Thackeray Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली.

विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचाय गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब उपस्थिती दर्शवली. दोन्ही नेत्यांची पुढची पिढी म्हणजेच राज यांचे पुत्र अमित ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यावेळी हजर असल्याचे दिसून आले.

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचे स्वागत श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृशाली शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

राज ठाकरेंच्या कुटुंबासोबत विशेष बाब म्हणजे, मनसेचे राज्यातील एकमेव आमदार राजू पाटीलदेखील बाप्पाच्या दर्शनाला सोबतच होते.

एकनाथ शिंदे यांनी राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणेश चतुर्थींच्या दुसऱ्याच दिवशी हजेरी लावली होती.

त्यानंतर, राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी केव्हा जाणार, असे प्रश्न पडलेल्यांना आज त्याचे उत्तर मिळाले.

वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पासाठी अतिशय सुंदर आरास करण्यात आली आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठी राज संध्याकाळच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी राज ठाकरे यांनी मनोभावे हात जोडून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

बाप्पाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर ठाकरे कुटुंब, शिंदे कुटुंब आणि इतर काही पाहुण्यांचा चहा आणि गप्पांचा छान कार्यक्रम रंगला.

याशिवाय, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात खासगीत देखील काही गप्पा रंगल्याचे दिसून आले. त्यामुळे लवकरच राज्यात काही नवे राजकीय बदलही घडू शकतील असे सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज शिवसेनेत असल्यापासूनचे एकमेकांचे सहकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यात राजकीय गप्पा नक्कीच रंगल्या असतील अशी चर्चा आहे.

मात्र, गणपती बाप्पाचा सण हा आनंदाचा आणि भेटीगाठींचा सण असल्याने या भेटींदरम्यान राजकीय चर्चा होत नाहीत, असे सर्वच नेतेमंडळी सांगताना दिसतात. त्यामुळे आजच्या भेटीत नक्की काय घडले हे तर येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईल.