‘अशा’ तरुणांना फटकवायला हवे, कर्नाटकच्या सांस्कृतिक मंत्र्यांचा त्रागा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 08:19 AM2024-03-26T08:19:00+5:302024-03-26T08:19:38+5:30

केंद्र सरकारवर टीका करताना तंगडागी यांची जीभ घसरली.

Youths Who Praise PM Modi should be slapped, says Karnataka Minister Shivaraj Tangadagi | ‘अशा’ तरुणांना फटकवायला हवे, कर्नाटकच्या सांस्कृतिक मंत्र्यांचा त्रागा

‘अशा’ तरुणांना फटकवायला हवे, कर्नाटकच्या सांस्कृतिक मंत्र्यांचा त्रागा

बंगळुरू : जे तरुण, विद्यार्थी ‘मोदी... मोदी...’ च्या घोषणा देतात, त्यांच्या नावाचा जयघोष करतात त्यांना फटकावयला हवे... त्यांच्या थोबाडीतच ठेवून द्यायला हवे... अशा शब्दांत कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडागी यांनी त्रागा व्यक्त केला आहे. कोप्पल जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

केंद्र सरकारवर टीका करताना तंगडागी यांची जीभ घसरली. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयघोष करणाऱ्या तरुणांवरच टीकेची तोफ डागली. केंद्र सरकारने दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्या अर्थाने गेल्या दहा वर्षांत २० कोटी रोजगार निर्माण होणे गरेजेचे होते. प्रत्यक्षात मात्र विदारक स्थिती आहे. असे असतानाही तरुण, विद्यार्थी मोदींचा जयघोष करत असतात. अशांच्या श्रीमुखात भडकवायला हवे, असे तंगडागी म्हणाले.  (वृत्तसंस्था)

 या तरुणांनी केंद्र सरकारला, मोदींना प्रश्न विचारायला हवेत. मात्र, ते त्यांच्या गुणगानात रंगले आहेत, असा त्रागा तंगडागी यांनी व्यक्त केला. विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात अपयशी ठरल्याने भाजपला खरे मते मागताना लाज वाटली पाहिजे, असे जळजळीत टीकास्त्रही मंत्रिमहोदयांनी सोडले.

 तंगडागी यांच्या विधानावर कर्नाटकातील भाजप नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आम्हाला तरुणांचा पाठिंबा मिळतो आहे, म्हणून काँग्रेस एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करते आहे, असे प्रत्युत्तरही त्यांनी दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी एक्सवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या नेत्यांचा तोल सुटलाय आणि ते मोदींना हुकूमशहा म्हणत आहेत, अशी टीका केली आहे.

Web Title: Youths Who Praise PM Modi should be slapped, says Karnataka Minister Shivaraj Tangadagi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.