काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; ४३ जणांचा समावेश, युवकांना संधी, ७६ टक्के ओबीसी, एससीएसटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 05:53 AM2024-03-13T05:53:23+5:302024-03-13T05:53:33+5:30

या यादीत २५ उमेदवारांचे वय ५० वर्षांखालचे असून ५१ ते ६० वयोगटातील ८ तर ६१ ते ७२ वयोगटातील १० उमेदवारांचा समावेश आहे.

second list of congress announced inclusion of 43 candidates for lok sabha election 2024 | काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; ४३ जणांचा समावेश, युवकांना संधी, ७६ टक्के ओबीसी, एससीएसटी

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; ४३ जणांचा समावेश, युवकांना संधी, ७६ टक्के ओबीसी, एससीएसटी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ तसेच प्रद्युत बोर्डोलोई या लोकसभेच्या तीन विद्यमान खासदारांचा समावेश असलेल्या ४३ उमेदवारांची दुसरी यादी आज काँग्रेसने जाहीर केली.

आसामच्या बारपेटा मतदारसंघाचे खासदार अब्दुल खलिक यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून त्यांच्याजागी दीप बायान यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यंदा गौरव गोगोई आसामच्या कालियाबोर मतदारसंघाऐवजी जोरहाट मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. छिंदवाडा मतदारसंघातून नकुल नाथ दुसऱ्यांदा निवडणूक लढतील. गेल्या वेळी जोधपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरुद्ध पराभूत झालेले राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे बडे नेते अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत यावेळी जालोर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी ही यादी जाहीर केली. 

युवकांना संधी

- या यादीत २५ उमेदवारांचे वय ५० वर्षांखालचे असून ५१ ते ६० वयोगटातील ८ तर ६१ ते ७२ वयोगटातील १० उमेदवारांचा समावेश आहे.  काँग्रेसने शनिवारी, ९ मार्च रोजी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. 

- आतापर्यंत जाहीर केलेल्या ८२ उमेदवारांमध्ये काँग्रेसने ७६.७ टक्के ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती आणि अल्पसंख्यक उमेदवारांना संधी दिली आहे.

मविआचे घोडे अडल्याने संभ्रम

वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावानंतर राज्यातील फिस्कटलेल्या लोकसभेच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीला बैठकीसाठी मुहूर्त अद्याप मिळालेला नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी ९ मार्च, त्यानंतर १२ मार्चची तारीख ठरली, मात्र प्रत्यक्षात बैठकच झाली नाही. महाविकास आघाडीची शेवटची बैठक ६ मार्चला पार पडली. वंचितने प्रस्ताव दिला, त्यावर एकमत न झाल्याने नव्याने प्रस्ताव मागवण्यात आला. 

ठाकरे गटाकडून थेट जागा जाहीर

एकीकडे जागावाटप झाले नसताना ठाकरे गटाने जागा जाहीर करण्याचा धडाका लावण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तिकर तर सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर संभाजीनगर मतदारसंघावर दावा सांगत तेथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही ठाकरे गटाकडून उद्या करण्यात येणार आहे. 

काँग्रेसचे राज्यनिहाय उमेदवार

आसाम    १२ 
राजस्थान    १०
मध्य प्रदेश    १०
गुजरात    ७
उत्तराखंड    ३ 
दमण आणि दीव    १
 

Web Title: second list of congress announced inclusion of 43 candidates for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.