विरोधकांची इंडिया आघाडी एखाद्या फिल्टर कॉफीसारखी - तृणमूलचे नेते शत्रुघ्न सिन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 09:45 AM2024-03-24T09:45:11+5:302024-03-24T09:45:49+5:30

मागील निवडणुकांचा इतिहास लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकांत काँग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तृणमूल काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.

Opposition's India Aghadi is like filter coffee - Trinamool leader Shatrughan Sinha | विरोधकांची इंडिया आघाडी एखाद्या फिल्टर कॉफीसारखी - तृणमूलचे नेते शत्रुघ्न सिन्हा 

विरोधकांची इंडिया आघाडी एखाद्या फिल्टर कॉफीसारखी - तृणमूलचे नेते शत्रुघ्न सिन्हा 

कोलकाता : विरोधकांची इंडिया आघाडी एखाद्या फिल्टर कॉफीसारखी आहे. मागील निवडणुकांचा इतिहास लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकांत काँग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तृणमूल काँग्रेसचे नेते व खासदार तसेच प्रख्यात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.
ते म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशभर काढत असलेल्या यात्रा क्रांतिकारी स्वरूपाच्या आहेत. लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या गेमचेंजरची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. निवडणूक रोखे हा भाजपने केलेला खूप मोठा भ्रष्टाचार आहे. 
शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, इंडिया आघाडीमध्ये देशभरातील अनेक पक्षांचा समावेश आहे. त्यामुळेच या आघाडीला मी फिल्टर कॉफी म्हणतो. आणखी विरोधी पक्ष जर या आघाडीत सामील झाले तर या फिल्टर कॉफीची लज्जत आणखी वाढेल. काँग्रेस हा जुनाजाणता पक्ष असून,  तो राष्ट्रीय पक्ष आहे हे अमान्य करता येणार नाही, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

‘सात टप्प्यातील मतदान हे विराेधकांसाठी वरदान’
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, सात टप्प्यातील निवडणुका विरोधी पक्षांसाठी भगवा कॅम्पच्या खंडणी आणि ब्लॅकमेल रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एक वरदान आहे. एनडीएला सीबीआय, ईडी, आयकर यांचा पाठिंबा आहे, तर इंडिया आघाडीच्या पाठीशी जनता उभी आहे. इंडिया आघाडीमध्ये घटक पक्षांची फार संख्या नाही असे अनेकांना वाटते. मात्र, या आघाडीला जनतेचा मोठा पाठिंबा आहे. देशाच्या अनेक भागांत इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 
 

Web Title: Opposition's India Aghadi is like filter coffee - Trinamool leader Shatrughan Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.