भाजपाने उमेदवारी नाकारली, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत वरुण गांधींनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 02:26 PM2024-03-27T14:26:34+5:302024-03-27T14:28:27+5:30

Varun Gandhi, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करताना भाजपाने काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. गेल्या काही काळापासून भाजपा आणि केंद्रीय नेतृत्वाविरोधात भूमिका घेणारे खासदार वरुण गांधी यांनाही उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता.

Lok Sabha Election 2024: Varun Gandhi will not contest the Lok Sabha elections, Maneka Gandhi will campaign in Sultanpur | भाजपाने उमेदवारी नाकारली, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत वरुण गांधींनी घेतला मोठा निर्णय

भाजपाने उमेदवारी नाकारली, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत वरुण गांधींनी घेतला मोठा निर्णय

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करताना भाजपाने काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. गेल्या काही काळापासून भाजपा आणि केंद्रीय नेतृत्वाविरोधात भूमिका घेणारे खासदार वरुण गांधी यांनाही उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. दरम्यान, उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर वरुण गांधी हे कुठल्या तरी पक्षात दाखल होतील किंवा अपक्ष निवडणूक लढवतील, असे दावे करण्यात येत होते. मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत वरुण गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. वरुण गांधी हे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहेत. तसेच ते सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आई मनेका गांधी यांच्या प्रचारावर लक्ष्य केंद्रित करतील, असेही सांगण्यात येत आहे.  

भाजपाने यावेळी पिलिभीत लोकसभा मतदारसंघातून वरुण गांधी यांना उमेदवारी न देता त्यांच्या जागी जितिन प्रसाद यांना संधी दिली आहे. मात्र वरुण गांधींच्या मातोश्री मनेका गांधी यांना भाजपाने सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा संधी दिली आहे. दरम्यान, वरुण गांधी यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला होता. त्यामुळे ते बंडखोरी करून पिलिभीत येथून अपक्ष निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होता. मात्र आता त्यांच्या टीमने वरुण गांधी हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

दरम्यान, भाजपाचे उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष वरुण गांधी यांना उमेदवारी न देण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, यावेळी पक्षाने त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिलेली नाही. मात्र ते आमच्यासोबत आहेत. त्यांच्याबाबत पक्ष नेतृत्वाने काही चांगला विचार केलेला असावा. दरम्यान, वरुण गांधी हे गांधी कुटुंबातील असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला होता. तसेच त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना भूपेंद्र सिंह म्हणाले की, वरुण गांधी हे भाजपाचे सच्चे शिपाई आहेत. तसेच ते भाजपामध्येच राहतील, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते गांधी कुटुंबातील आहेत आणि भाजपानेच त्यांना तीन वेळा खासदार बनवलं आहे. 

वरुण गांधी हे २००४ मध्ये भाजपामध्ये दाखल झाले होते. त्यानंतर २००९ मध्ये पिलिभीत येथून लोकसभा निवडणूक लढवून ते लोकसभेत पोहोचले होते. त्यानंतर २०१४ मध्ये सुल्तानपूर आणि २०१९ मध्ये पुन्हा पिलिभीत येथून ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. दरम्यान, गतवर्षी राहुल गांधी यांनी एका मुलाखतीमध्ये वरुण गांधी यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, मी त्यांना भेटू शकतो, त्यांची गळाभेट घेऊ शकतो. मात्र ते ज्या विचारसरणीशी संबंधित आहेत तिला मी स्वीकारू शकत नाही. हे अशक्य आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.  

Web Title: Lok Sabha Election 2024: Varun Gandhi will not contest the Lok Sabha elections, Maneka Gandhi will campaign in Sultanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.