लोकसभा निकालाची उत्कंठा शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 01:12 AM2019-05-22T01:12:13+5:302019-05-22T01:12:32+5:30

गेल्या तीन महिन्यांपासून उत्सुकता ताणल्या गेलेल्या जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी करण्यात येणार असून, निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

 Shigla's longing for Lok Sabha election | लोकसभा निकालाची उत्कंठा शिगेला

लोकसभा निकालाची उत्कंठा शिगेला

Next

नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून उत्सुकता ताणल्या गेलेल्या जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी करण्यात येणार असून, निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या दावे-प्रतिदाव्यांमुळे उमेदवार व समर्थकांची धाकधूक वाढली आहे.
जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत २९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले होते. त्यात नाशिक मतदारसंघात ५९.४३ व दिंडोरीत ६५.६४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. तत्पूर्वी या निवडणुकीच्या निमित्ताने जानेवारी महिन्यापासूनच राजकीय वातावरण तप्त झाले होते. निवडणूक लढविणाºया राजकीय पक्षांनी मेळावे, बैठका घेऊन मतदारांचा कल जाणून घेण्याबरोबरच उमेदवारांचीही चाचपणी केली होती. नाशिक लोकसभा मतदारसंघाने नेहमीच परिवर्तन केले असल्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबत संशय घेतला जात होता, त्याचबरोबर पक्षातील अन्य इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावेदारी केल्यामुळे चुरस निर्माण झाली होती. अखेर गोडसे यांनी बाजी मारून उमेदवारी आणली, तर राष्टÑवादीकडून भुजबळ कुटुंबीयातील कोणीतरी उमेदवारी करणार असल्याचे निश्चित मानले जात असताना मोठे भुजबळ की छोटे याबाबत उत्सुकता ताणली जात असताना माजी खासदार समीर भुजबळ यांना पक्षाने उमेदवारी दिली. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे बहुजन वंचित आघाडीने यंदा पहिल्यांदाच उमेदवार रिंगणात उतरविला. माजी नगरसेवक पवन पवार यांना उमेदवारी दिली, तर सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी सेना व भाजपाकडे उमेदवारी मागितली, परंतु पदरी निराशा पडल्याने त्यांनी थेट बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली. या प्रमुख चार उमेदवारांसह निवडणुकीच्या रिंगणात १८ उमेदवार उतरल्याने मतदानासाठी दोन यंत्रे वापरण्यात आली.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांना पक्षाने उमेदवारी नाकारली तर त्यांच्या जागी राष्टÑवादीतून आलेल्या डॉ. भारती पवार यांना ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. राष्टÑवादी कॉँग्रेसनेदेखील दिंडोरीचे शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने दोन्ही प्रमुख पक्षांनी आयात उमेदवारांना उमेदवारी दिली.
दावे-प्रतिदावे
आदिवासींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातील पेठ, सुरगाणा, कळवणवर पकड ठेवून असलेले माकपाचे विद्यमान आमदार जिवा पांडू गावित यांनीही निवडणुकीत उडी घेऊन चुरस वाढवली.
याशिवाय बहुजन वंचित आघाडी, बसपा यांच्यासह पाच उमेदवार रिंगणात आहेत. दिंडोरीत गेल्या वेळेपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढल्याने त्याचा कोणाला लाभ होतो किंवा फटका बसतो ते गुरुवारी कळणार आहे.
दोन्ही मतदारसंघांतील सर्वच उमेदवारांनी विजयाचे दावे केले असले तरी, उमेदवार व त्यांच्या समर्थकांची धडधड वाढली आहे.
रविवारी वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केल्यानंतर त्यावर होणारे दावे, प्रतिदावे पाहता, मतदानयंत्रातून काय चमत्कार होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
निकालाची उत्सुकता शहरी भागासह ग्रामीण भागात देखील पराकोटीला पोहचली असून एक्झिट पोल नंतर दावे-प्रतिदावे अधिकच तीव्र झाले आहे़
प्रशासनाची तयारी पूर्ण
गुरुवारी सकाळी आठ वाजता अंबडच्या सेंट्रल वेअर हाउस येथे मतमोजणी करण्यात येणार असून, प्रशासनाने त्याची तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीसाठी दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी ८६ टेबल लावण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे दोन हजार कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी कर्मचारी, अधिकाºयांच्या प्रशिक्षणाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. मंगळवारी प्रशासनाने मतमोजणीची रंगीत तालीम पूर्ण केली. निवडणुकीच्या निकालाचा विचार करता शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तर मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Web Title:  Shigla's longing for Lok Sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.