भाजप-शिवसेनेची युती पडणार भुसेंच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:53 AM2019-05-25T00:53:46+5:302019-05-25T00:54:02+5:30

धुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल देऊन पुन्हा एकदा भाजप उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पारड्यात मतदान करून त्यांना दुसऱ्यांदा लोकसभेत काम करण्याची संधी दिली आहे.

 BJP-Shiv Sena alliance will fall on Bhusn Path | भाजप-शिवसेनेची युती पडणार भुसेंच्या पथ्यावर

भाजप-शिवसेनेची युती पडणार भुसेंच्या पथ्यावर

Next

धुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल देऊन पुन्हा एकदा भाजप उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पारड्यात मतदान करून त्यांना दुसऱ्यांदा लोकसभेत काम करण्याची संधी दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून, मालेगाव बाह्य मतदारसंघात मात्र शिवसेनेचे विद्यमान ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या दृष्टीने हा मतदारसंघ अधिक सोपा झाल्याचे दिसून येते.
मालेगाव बाह्य मतदारसंघात सतत तीन वेळा विजयाची हॅट्ट्रिक केलेल्या दादा भुसे यांना पुन्हा चौथ्यावेळी उमेदवारी मिळून त्यांना विजयाची संधी चालून आली आहे. कारण गेल्या वेळी त्यांच्या विरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसकडून लढत देणारे सुनील गायकवाड आता भाजप पक्षात आलेले आहेत. भाजप आणि शिवसेनेची युती असल्याने गेल्यावेळी जरी भाजपने उमेदवार दिलेला असला तरी यावेळी हमखास निवडून येणारा उमेदवार म्हणून शिवसेनेतर्फे दादा भुसे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपशी वाटाघाटी करीत शिवसेना या जागेवर आपलाच उमेदवार मैदानात उतरवेल परिणामी भाजपला उमेदवारीवर पाणी सोडावे लागेल. भुसे यांचे कट्टर विरोधक असलेले अद्वय हिरे यांनीदेखील मागच्यावेळी भाजपमध्ये प्रवेश करून नांदगाव तालुक्यातून निवडणूक लढवली होती, तर त्यांचे समर्थक असलेले पवन ठाकरे यांना भाजपतर्फे दादा भुसे यांच्या विरोधात मैदानात उतरविले होते. त्यामुळे गेल्यावेळीदेखील मोदी लाट असताना दादा भुसे यांचा विजय झाला होता.
वंचित आघाडीकडे लक्ष
लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला पुन्हा दुसऱ्यांदा संधी मिळाली असून, डॉ. सुभाष भामरे यांच्या विजयात मालेगाव शहर व जिल्हा शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. हे नाकारून चालणार नाही. शिवसेना भाजप यांची आता युती झाल्याने भुसे यांचे बळ निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे यावेळी युतीचे उमेदवार म्हणून दादा भुसे मैदानात उतरल्यास त्यांचे विरोधात राष्टÑवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस यांच्या आघाडीतर्फे कुणाला मैदानात उतरविले जाते याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. कारण या मतदारसंघातून राकॉँचे दिग्गज नेते माजीमंत्री छगन भुजबळदेखील व्यूहरचना करीत आहेत. तर मनसेचीही भूमिका लक्ष्यवेधी ठरणार आहे. कॉँग्रेस - राष्टÑवादीने दिलेल्या उमेदवाराचा मनसे प्रचार करते, की स्वतंत्र उमेदवार मैदानात घेऊन निवडणूक लढते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्यात वंचित आघाडीकडेही दुर्लक्ष करून चालणारे नाही. मालेगाव बाह्य मतदारसंघात काही प्रमाणात असलेली दलित व मुस्लिमांची मतेही परिणाम करू शकतात, तर भुसे यांनी मुस्लीम भागात केलेली कामे त्यांच्या जमेची बाजू आहेत. मात्र इतके असले तरी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासाठी निवडणूक सध्या तरी सोपी असल्याचे दिसते.

Web Title:  BJP-Shiv Sena alliance will fall on Bhusn Path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.