पक्षासोबत अपक्षांचेही पीक आले जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:10 AM2019-04-05T00:10:04+5:302019-04-05T00:14:25+5:30

लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला असता पहिल्या काही लोकसभा निवडणुकांत प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह मोजकेच उमेदवार रिंगणात उतरायचे.

many Independent candidate contest with main political party | पक्षासोबत अपक्षांचेही पीक आले जोमात

पक्षासोबत अपक्षांचेही पीक आले जोमात

googlenewsNext
ठळक मुद्देयंदा १४ जण रिंगणात १९८७ पर्यंत उमेदवार होते दहाच्या आत

विशाल सोनटक्के।
नांदेड : लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला असता पहिल्या काही लोकसभा निवडणुकांत प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह मोजकेच उमेदवार रिंगणात उतरायचे. मात्र मतदारांसोबत नोंदणीकृत पक्षांची संख्या वाढत गेली. त्यामुळे १९८७ च्या लोकसभा निवडणुका पाहिल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत दहांहून अधिक उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसून येते.
१९५१ साली पार पडलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ६ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्टÑीयकृत तसेच नोंदणीकृत पक्षाचे ५ तर केवळ १ अपक्ष मैदानात उतरला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोविंदराव तानाजी महाले यांनीही ३९ हजार ११२ मते खेचली होती. १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत तर अवघे ४ उमेदवार रिंगणात होते. भारतीय राष्टÑीय काँग्रेसकडून देवराव कांबळे आणि बिंदू दिगंबरराव तर शेड्यूल्डकास्ट फेडरेशनकडून हरिहर सोनुले आणि पीएसपीकडून विजेंद्र काबरा यांनी नशीब आजमाविले होते. यातील देवराव कांबळे आणि हरिहर सोनुले हे दोघे निवडून आले होते.
१९६२ च्या निवडणुकीतही लोकसभेसाठी चौरंगी सामनाच रंगला होता. नोंदणीकृत पक्षाचे २ तर दोघा अपक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली होती. १९६७ मध्येही केवळ चारच उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत काँग्रेसच्या व्ही. बी. तरोडेकर यांनी ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवित एकतर्फी विजय मिळविला होता. १९७१ ची निवडणूक ही तरोडेकर यांनीच जिंकली. या निवडणुकीत त्यांनी तब्बल ६४.४४ टक्के इतकी मते घेतली होती. प्रतिस्पर्धी उमेदवार यशवंत आंबेडकर यांना २५.६० टक्के मते मिळाली होती. आंबेडकर हे या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत तर थेट दुरंगी लढत झाली होती. पीडब्ल्यूपी पक्षाकडून उतरलेल्या केशवराव धोंडगे यांचा काँग्रेसच्या गोविंदराव म्हैसकर यांच्याशी थेट सामना झाला होता. म्हैसकर यांना ३२.०९ टक्के मते मिळाली तर ही निवडणूक जिंकलेल्या केशवराव धोंडगे यांना ६७.९१ टक्के मते मिळाली होती.
१९८० च्या निवडणुकीत शंकरराव चव्हाण काँग्रेसच्या वतीने पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. या निवडणुकीत ५ उमेदवार रिंगणात होते. शंकरराव चव्हाण यांची लढत पीडब्ल्यूपीच्या केशवराव धोंडगे यांच्याशी झाली होती. शंकरराव चव्हाण यांनी तब्बल १० टक्के मते अधिक घेत विजय मिळविला होता. १९८४ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच अपक्षांची संख्या वाढल्याचे दिसून येते. तत्कालीन विद्यमान खा. शंकरराव चव्हाण आणि आईसीएसचे कमलकिशोर कदम यांच्यात त्यावेळी सामना रंगला होता. यावेळी ६ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार कमलकिशोर कदम यांच्यापेक्षा दुप्पटीहून अधिक मते घेत शंकरराव चव्हाण हे सलग दुसऱ्यांदा लोकसभेत विजयी झाले होते. कमलकिशोर कदम यांना १ लाख ३४ हजार ५०२ इतकी मते मिळाली होती. तर शंकरराव चव्हाण यांना ३ लाख ६ हजार २६ मते मिळाली होती.
१९८७ साली झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय पक्षाकडून अशोक चव्हाण हे एकमेव उमेदवार रिंगणात होते तर ७ उमेदवार अपक्ष म्हणून नशीब अजमावित होते. या निवडणुकीत अशोक चव्हाण विरोधात प्रकाश आंबेडकर असा सामना रंगला होता. त्यामुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते़ त्यात अशोक चव्हाण यांना २ लाख ८३ हजार १९ मते मिळाली तर प्रकाश आंबेडकर यांना १ लाख ७१ हजार ९०१ मतांवर समाधान मानावे लागले. पाच अपक्ष उमेदवारांना पाच हजाराहुन कमी मते मिळाली़
मतदारांसोबत वाढत गेली उमेदवारांचीही भाऊगर्दी
१९८९ च्या निवडणुकीत १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत व्यंकटेश काब्दे विरुद्ध अशोक चव्हाण असा सामना रंगला होता. यात चव्हाण यांचा निसटत्या फरकाने पराभव झाला होता. या निवडणुकीत तब्बल ९ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. १९९१ च्या निवडणुकीत २० उमेदवारांनी नशीब आजमाविले. यात काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील विजयी झाल्या होत्या. तब्बल १५ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १९९६ च्या निवडणुकीतही असेच विक्रमी उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसून आले. तब्बल २४ जणांनी ही निवडणूक लढली. यात तब्बल १८ अपक्ष उमेदवारांचा सहभाग होता. १९९८ मध्ये उमेदवारांची ही संख्या काहीशी कमी झाली. मात्र तरीही १३ जण रिंगणात होते. १९९९ मध्ये ७ जणांनी निवडणूक लढविली तर २००४ मध्ये पुन्हा १३ उमेदवार रिंगणात उतरले. २००९ मध्ये उमेदवारांची हीच संख्या २२ वर पोहोचली. तर २०१४ मध्ये ती २४ इतकी झाली. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही काँग्रेसच्या वतीने अशोकराव चव्हाण ८१ हजारांहून अधिक मते घेत विजयी झाले होते.
भास्कररावांना तीनवेळातर चौघांना दोनदा संधी
नांदेड लोकसभा मतदारसंघाने तब्बल चार उमेदवारांना दोनदा निवडून येण्याची संधी दिली. देवराव कांबळे १९५१ आणि १९५७ ला निवडून आले. तर त्यानंतर व्ही. बी. तरोडेकर यांना १९६७ आणि १९७१ अशी सलग दोनदा संधी मिळाली. शंकरराव चव्हाण यांचाही १९८० आणि १९८४ अशा सलग दोन निवडणुकांत विजय झाला. तर अशोकराव चव्हाण यांना १९८७ आणि २०१४ मध्ये मतदारांनी संसदेत पाठविले. तत्कालीन काँग्रेसच्या भास्करराव पाटील खतगावकरांना या मतदारसंघातून सर्वाधिक जास्त म्हणजे तीनवेळा संधी मिळाली. खतगावकर हे १९९८, १९९९ आणि २००९ मध्ये विजयी झाले होेते. यंदाच्या निवडणुकीत अशोक चव्हाण पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत़ त्यांची लढत भाजपाच्या प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित आघाडीच्या प्रा़ यशपाल भिंगे यांच्यासोबत होत आहे़

Web Title: many Independent candidate contest with main political party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.